सोलापूरराजकीय

प्रणिती शिंदे प्रचारासाठी ज्या रस्त्याने गल्लीबोळात फिरत आहेत ते रस्ते केले भाजपने

भाजपचे राम सातपुते यांनी केली काँग्रेसची पोलखोल

सोलापूर : पुलवामा हल्ला भाजपने घडवून आणला होता असा आरोप काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. भारतमातेशी गद्दारी करणे हे काँग्रेसच्या रक्तातच आहे, असा घणाघात भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी केला.

भाजपातर्फे आयोजित युवा संवाद कार्यक्रमानंतर त्यांनी शांतीसागर मंगल कार्यालय येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पाकिस्तानकडून जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे भारतीय सैनिकांवर करण्यात आलेला हल्ला भारतीय जनता पार्टीने घडवून आणला होता असा आरोप काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला होता. या आरोपांना भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी रविवारी जोरदार प्रत्युत्तर देत काँग्रेसचा निषेध व्यक्त केला.

पुलवामा हल्ला हा पाकिस्तानने केला होता याबाबत पाकिस्तानच्या संसदेतही चर्चा झाली होती. असे असतानाही काँग्रेसने असा अत्यंत चुकीचा आणि भारतमातेशी गद्दारी करणारा आरोप करणे निषेधार्ह आहे. काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी हुतात्मा भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे सत्तेत असताना अतिरेक्यांचे सोलापूरशी असलेले संबंध अधिकाऱ्यांना मिळाले होते. या अतिरेक्यांवर कारवाई देखील होणार होती. परंतु सत्तेचा वापर करून १२ अतिरेक्यांना वाचवण्याचे पाप काँग्रेसने केले आहे, असा आरोपही भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूरसह देशभरात केलेल्या विकासकामांच्या आधारावरच भाजप निवडणूक लढवत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून ४० हजार कोटींचे रस्ते बांधण्यात आले आहेत. ३० हजार कामगारांना घरे बांधून देण्यात आली आहेत. सोलापुरातील दोन लाख नागरिकांना मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज देण्यात आले आहे. सोलापूर – हैदराबाद, सोलापूर – विजयपूर, सोलापूर – सांगली, सोलापूर – छत्रपती संभाजीनगर असे अनेक रस्ते मोदी सरकारच्या काळात झाले आहेत. गेल्या ७० वर्षांमध्ये सोलापूर विमानतळाचे काम होऊ शकले नाही. ते आता मोदी सरकारच्या काळात लवकरच पूर्ण होत आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी सोलापुरातील मिल बंद पाडल्या, उद्योगधंदे बंद पाडले, सोलापूरकरांना देशोधडीला लावले. रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता आहे हे न कळण्यासारखी परिस्थिती पूर्वी होती. आता मात्र काँग्रेसच्या उमेदवार ज्या रस्त्याने सोलापूरहून अक्कलकोट, मंगळवेढ्याला ज्या रस्त्याने जातात, गल्लीबोळातून ज्या रस्त्यांनी त्या फिरतात ते रस्ते भाजपच्या खासदारांनी केले आहेत. ही निवडणूक सोलापूरच्या भविष्याची आहे. त्यामुळे सोलापूरची जनता महायुतीच्याच पाठीशी आहे, असा ठाम विश्वास भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रासप, रिपाई महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांनी याप्रसंगी व्यक्त केला. यावेळी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button