मंद्रूप पोलीस, तहसीलदार थांबले, रस्त्याचा वाद पोहोचला झेडपीत
आमदार निधीतील मंजूर रस्त्याच्या राजकारणाचा शेतकऱ्यांना फटका

सोलापूर : मंद्रूप अपर तहसीलदारांनी सूचना केल्यावर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सुरू केलेल्या रस्त्याचे काम अचानकपणे थांबवण्यास सांगितल्याने अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यासाठी झेडपीत धाव घेतल्याचे शुक्रवारी दिसून आले. तेलगाव ते अंत्रोळी गट रस्त्याचा हा तंटा निर्माण झाला आहे.
जिल्हा नियोजन समितीमार्फत स्थानिक आमदार फंडातून तेलगाव मंद्रूप ते अंत्रोळी (ग्राम 63) असा रस्ता मंजूर झाला आहे. गट नंबर 78 ते 179 मधून पूर्वीपासून वहिवाटीचा हा रस्ता आहे. आमदार निधीतून मंजूर झालेल्या रस्त्याचे काम सुरू केल्यावर गट नंबर 79 चे खातेदार धरेप्पा बिराजदार यांनी काम आडवले. त्यामुळे हे प्रकरण मंद्रूप अप्पर तहसीलदार कार्यालयात आले. अप्पर तहसीलदार सुजित नरहरे यांनी याबाबत संबंधित मंडल अधिकाऱ्याचा अहवाल मागविला. मंडळ अधिकाऱ्यांनी हा रस्ता पूर्वीपासून वहिवाटीचा असून नकाशावर आहे, असा अभिप्राय दिला. त्यावरून अप्पर तहसीलदार नरहरे यांनी 20 मे रोजी मंद्रूप पोलीस ठाण्याला पत्र दिले. आमदार निधीतून हा रस्ता मंजूर असल्याने इतर सर्व शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने या रस्त्याचे काम होणे महत्त्वाचे असून कायदा व सुव्यवस्था होऊ नये, नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी शासकीय कामातील अडथळा दूर करावा, असे या पत्रात नमूद केले आहे.
या पत्रानुसार मंद्रूप पोलिसांनी घटनास्थळी जाऊन संबंधित शेतकऱ्याला पोलीस ठाण्यात आणले. त्यामुळे रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम सुरू केल्यानंतर सायंकाळी पोलिसांनी फोन करून या कामासाठी आलेला जेसीबी व ट्रॅक्टर बंद करावा, अशी सूचना केली. त्यामुळे या रस्त्याचे काम बंद पडले आहे.
आमदार निधीतील मंजूर झालेला हा रस्ता व्हावा म्हणून बसण्णा कुंभार, श्रीशैल कोळी, श्रीकृष्ण अथणी, गणपती कुसुरे, सिद्धाराम कुसुरे, कृष्णापा कोळी, अल्लाउद्दीन मुल्ला, यल्लिंग कोळी, रेवप्पा तेली, भीमाण्णा बिराजदार आदी शेतकऱ्यांनी शुक्रवारी झेडपीत धाव घेतली. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची भेट घेऊन या शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावर कोहिनकर यांनी प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून अभिप्राय द्यावा यासाठी हे प्रकरण बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे यांच्याकडे पाठवले आहे. आमदार निधीतील मंजूर रस्त्यातील राजकारणाचा या परिसरातील शेतकऱ्यांना फटका बसल्याचे दिसून येत आहे.