
सोलापूर : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जोरदार यशामुळे महाराष्ट्रात सरकार स्थापनेला वेग आला आहे. नव्या सरकारात दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचा समावेश व्हावा व त्यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद द्यावे, अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांमधून होत आहे.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आमदार सुभाष देशमुख यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक करीत मोठे मताधिक्य घेतले आहे. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टिकोन ठेवून त्यांचे काम चालले आहे. त्यामुळे त्यांच्या कामाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. सर्वांना सामावून घेऊन सोलापूर जिल्ह्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सामंजस्याने भूमिका घेण्याची सुभाष देशमुख यांची हातोटी असल्याने नव्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करून सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद त्यांना द्यावे अशी कार्यकर्त्यांनी मागणी केली आहे. सोलापूर जिल्ह्याचे चर्चेत राहिलेले अनेक प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित राहिले आहेत. या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असलेल्या नेत्यांची गरज आहे. सर्व तालुक्यांना समान न्याय व सोलापूरचे प्रश्न सुटले पाहिजेत अशा भूमिका घेणाऱ्या नेत्यांची गरज आहे. प्रशासनाला सोबत घेऊन नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या व मतदार संघात वेळ देणाऱ्या मंत्र्याची गरज आहे. आगामी होणाऱ्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणूक यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील आमदारालाच पालकमंत्री पद द्यावे अशी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांबरोबर माहिती मधील मित्र पक्षांची मागणी वाढली आहे. सोलापूर शहरातील बसपोर्ट, उड्डाणपूल, मनपा परिवहन सेवा, औद्योगिक क्षेत्र विकास आणि सिंचनाचा प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मकतेने भूमिका घेऊन पाठपुरावा करणाऱ्या नेत्यांची गरज आहे. सुभाष देशमुख यांच्यामध्ये विकासाचा दृष्टिकोन असल्याने त्यांना पालकमंत्री पद द्यावे असा सूर उद्योजक, तरुण आणि शेतकरी वर्गांमधून निघत आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस याबाबत नक्कीच विचार करतील असा विश्वास व्यक्त होत आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी स्थानिक पालकमंत्री हवा ही नागरिकांची मागणी योग्य आहे. यामध्ये आमदार सुभाषबापू देशमुख यांची चर्चा होत आहे. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक विचार करण्याची क्षमता बापूंमध्ये असल्याने कार्यकर्त्यांमधून त्यांना पालकमंत्री पद मागणे योग्यच आहे.
दिलीप पतंगे