
सोलापूर : ‘कुत्र्यांनी विनाकारण आमच्यावर भुंकू नये”, त्यांनी त्यांच्या पक्षातील कारभार सांभाळावा असे कडक प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांच्या टीकेला दिले आहे.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी कोणाची? याबाबत दिलेल्या निकालावर प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी बुधवारी दुपारी जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष काका साठे यांच्याशी संवाद साधला. राष्ट्रवादीची स्थापना शरद पवार यांनी केली पक्ष वाढवला. पण आता बहुमताच्या आधारावर निवडणूक आयोगाने विरोधात निर्णय दिला. निवडणूक आयोगाकडून निर्णय काय येणार हे जनतेला माहीतच होते. इडीची भीती दाखवून हे सरकार हुकुमशाही राबवत आहे. आम्ही निष्ठावंत आहोत. त्यामुळे शरद पवार यांचा गट भक्कम राहणार यात वाद नाही.
तुमचे वय झाले आहे आता तुम्ही राजीनामा द्यावा, अशी अजित पवार गटाचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी मागणी केली असल्याबाबत लक्ष वेधले असता काका साठे यांनी कडक शब्दात उत्तर दिले. कुत्र्याांनी आमच्यावर विनाकारण भुंकू नये. आमच्या पक्षात काय करायचे ते आम्ही ठरवू, त्यांनी त्यांचा पक्ष पहावा. आमचे काम, निष्ठा पाहून आमच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. जनतेचे पाठबळ आम्हाला आहे. सभेत बोलण्यास उभारल्यावर लोक आम्हाला खाली बसवत नाहीत, याचे भान त्यांनी ठेवावे.