सोलापूरसामाजिक

एकाच परिवारातील 86 जणांना मिळाले कुणबी प्रमाणपत्र

लऊळमधील लोकरे कुटुंबीयांनी व्यक्त केला आनंद

सोलापूर : माढा तालुक्यातील लऊळ या गावातील लोकरे कुटुंब हे गरजवंत मराठ्यांचे कुटुंब ठरले असून एकाच परिवारातील 86 जणांना कुणबी प्रमाणपत्र मिळाल्याची माहिती विलास लोकरे यांनी दिली आहे.

बुधवारी सकल मराठा समाजाचे नेते माऊली पवार, राजन जाधव, प्रा.गणेश देशमुख यांच्याहस्ते कुटुंबातील सर्व जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. लऊळ गावातील लोकरे कुटुंबाच्या स्वगृही हा छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित होते. त्यावेळी लोकरे कुटुंबातील नंदकुमार वामन लोकरे यांनी
सातत्याने पाठपुरावा करून हे सर्व कुणबी प्रमाणपत्र काढले. त्याचा पूर्ण आहेर देऊन सकल मराठा समाजाच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित लोकरे कुटुंब आणि नातेवाईकांनी घोषणा देऊन आनंद व्यक्त केला.

लोकरे कुटुंबाची 1859 ची कुणबी नोंद सापडली आहे. त्यामुळे संपूर्ण परिवाराला कुणबी प्रमाणपत्र मिळाले. लोकरे कुटुंब याचा आनंद साजरा करत आहे. परंतु मराठा समाजाने यावर न थांबता प्रत्येक वाड्यावर असे आनंद सोहळे साजरे झाले पाहिजेत. त्यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा माऊली पवार यांनी व्यक्त केली.

ज्याप्रमाणे लोकरे कुटुंबाने पाठपुरावा करून कुणबी दाखले काढले. त्याप्रमाणे सर्व मराठा समाजाने सातत्याने प्रयत्न करून पाठपुरावा करणे गरजेचे आहे असे मत राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले

मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे हे यश मिळाले असून केवळ जल्लोष न करता शासन दरबारी पाठपुरावा करून कुणबी प्रमाणपत्र मिळवावे. यासाठी सोलापुरात लवकरच कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती प्रा.गणेश देशमुख यांनी दिली.

माझ्या पूर्वजांच्या एका नोंदीवरून 86 जनाचे कुणबी दाखले मिळाले आहेत. मनोज जरंगे पाटलांच्या आंदोलनामुळे आलेले हे यश आहे. हे दाखले या आंदोलनातील सक्रिय असणारे सकल मराठा समाजाच्या नेत्यांच्याहस्ते आमच्या कुटुंबांनी स्वीकारले याचे आम्हाला समाधान असल्याचे मत विलास लोकरे यांनी व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button