
सोलापूर : भावकीतील हाणामारीच्या गुन्ह्यात पत्नीला अटक न करण्यासाठी पतीकडून आठ हजाराची लाच घेताना माळशिरस पोलीस ठाण्यातील हवलदार दत्तात्रय थोरात याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
यातील तक्रारदाराचे भावकीत भांडण झाले होते. याप्रकरणी माळशिरस पोलीस ठाण्यात परस्पर गुन्हे दाखल असून तक्रारदाराला जामीन मिळाला होता. या प्रकरणाचा तपास हवालदार थोरात यांच्याकडे आहे. तक्रारदाराच्या पत्नीला अटक न करण्यासाठी व या गुन्ह्यात न्यायालयीन कामकाजात मदत करण्यासाठी हवलदार थोरात यांनी तक्रारदाराला दहा हजाराची लाच मागितली. तडजोडीअंती आठ हजार देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने लासलुचपत विभागाशी संपर्क साधून तक्रार दाखल केली. पोलीस उपअधीक्षक कुंभार यांनी सापळा लावून खातरजमा केली. आरोपी थोरात हे तक्रारदाराकडून लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी त्यांना मंगळवारी रंगेहात पकडले. याबाबत माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून थोरात यांना अटक करण्यात आली आहे.