उपअभियंता बीडला यांनी शाखा अभियंता कोंडगुळेवर केलेली कारवाई रद्द
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा निर्णय

सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या उपअभियंता उषा बीडला यांनी शाखा अभियंता कोंडगुळे यांची रोखलेली पगारवाढ अखेर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी रद्द केली आहे.
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्यासाठी बीडीओना काही खास अधिकार दिले होते. या अधिकाराचा वापर करीत बीडीओ व विभाग प्रमुख सुडात्मक कारवाई करीत असल्याच्या तक्रारीत वाढ झाली आहे. ग्रामसेवक संघटनेने तर हे परिपत्रक रद्द करावे म्हणून ग्रामविकास विभागाच्या सचिवाकडे तक्रार केली आहे. अशात दक्षिण सोलापूर पंचायत समितीत घडलेले हे प्रकरण चर्चेला आले होते. दक्षिण सोलापूर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाच्या उपअभियंता उषा बीडला यांनी शाखा अभियंता कोंडगुळे यांची वेतनवाढ रोखण्याची कारवाई केली होती. या कारवाईविरुद्ध कोंडगुळे यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे अपील केले होते. त्यावेळी उपअभियंता बीडला यांना हा अधिकार आहे का? हा प्रश्न उपस्थित झाला होता. बिडला यांनी केलेली ही कारवाई जिल्हा परिषदेच्या वर्तुळात चर्चेची ठरली आहे.
उपअभियंता बीडला यांनी केलेली कारवाई चुकीची होती, त्यामुळे ती रद्द करण्यात आली आहे, असे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सांगितले. त्या परिपत्रकाच्याआधारे फक्त बीडिओना अधिकार देण्यात आले आहेत. त्यामुळे उपअभियंत्याना वेतनवाढ रोखण्याची कारवाई करता येणार नाही, तो माझा अधिकार आहे, असे सीईओ जंगम यांनी स्पष्ट केले.
यंदा बजेट घटणार…
सध्या जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे अर्थसंकल्पाची तयारी सुरू आहे. प्रत्येक विभागाकडून अहवाल मागितला आहे. पुढील आठवड्यात बजेटची तारीख ठरवली जाईल. यंदा बजेट आठ ते दहा कोटीने घटल असा अंदाज सीईओ जंगम यांनी व्यक्त केला आहे. झेडपीच्या ठेवीवरील व्याजदर कमी होणार असल्याने ही आर्थिक तूट येणार आहे. बँकांची खाती ऑनलाईन झाल्याने खात्यावर असलेल्या रकमा थेट कामासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे रकमा खर्च होतील तसे व्याजदर घटत जात असल्याने बजेटवर याचा परिणाम दिसून येणार आहे. बजेटमध्ये नाविन्यपूर्ण कल्पना आणण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य केंद्र, अंगणवाडीतील सेविकेकडून माहिती घेतली जात आहे, असेही ते म्हणाले.