
सोलापूर : दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सोमनाथ वैद्य यांच्या प्रचारात काढण्यात आलेल्या पदयात्रेला सोलापुरात मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात सोमनाथ वैद्य हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात आहेत. आतापर्यंत त्यांनी मतदारसंघातील ग्रामीण भाग पिंजून काढला आहे. त्यानंतर त्यांनी या मतदारसंघातील शहरी भागाकडे आपला मोर्चा वळविला आहे. रविवारी सकाळी त्यांनी सोलापुरातील सलगरवस्ती, पारधी वस्ती या परिसरातून पदयात्रा काढली. या पदयात्रेमध्ये अर्जुन जाधव, लक्ष्मी जाधव, सचिन गायकवाड, मारुती गडाख, मच्छिंद्र क्षीरसागर, राजश्री कांबळे, दत्ता पवार, सदा नाईकवाडी, अशोक मसरे, सागर आपटे, संजय नकाते आदी सहभागी झाले होते. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सामान्य जनता माझ्याबरोबर आहे. या जनतेने मला निवडून दिल्यास जनतेचा आमदार म्हणून मी काम करेन असे आश्वासन वैद्य यांनी यावेळी मतदारांना दिले. गेल्या दोन महिन्यापासून या मतदारसंघातील मतदारांच्या मी संपर्कात असल्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली आहे. मी कुठे प्रचाराला जाईल तिथे विरोधक येऊन संपर्क साधत आहेत. पण दक्षिण सोलापुरातील जनता विरोधकांच्या भूलथापांना कंटाळली आहे. विद्यमान आमदारांनी जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष दिलेले नाही. मंत्रालयातील आपल्या संपर्काच्या जोरावर जनतेचे मी हे प्रश्न सोडविण्यावर भर देणार असल्याचेही वैद्य यांनी स्पष्ट केले.