
सोलापूर : होटगी रोडवरील सोलापूर विमानतळ व सिध्देश्वर साखर कारखान्याच्या जमिनीची मोजणी करून हद्द निश्चित करण्याच्या अप्पर जिल्हाधिकार्यांच्या आदेशास तूर्तास मनाई करण्याचा सिध्देश्वर साखर कारखान्याचा अर्ज वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती जवादवाड यांनी नामंजूर केला.
डिसेंबर 2023 मध्ये अप्पर जिल्हाधिकारी यांनी सोलापूर विमानतळ व सिध्देश्वर साखर कारखान्याच्या जमिनीची मोजणी करून त्यांच्या हद्दी कायम कराव्यात असा आदेश दिलेला आहे. त्याबबात शासनाने 28 मार्च 2024 रोजी मोजणी करण्याबाबतच्या नोटीस विमानतळ व कारखान्यास पाठविली होती. त्यामुळे ही मोजणी रद्द करावी व अप्पर जिल्हाधिकार्यांच्या आदेशास तूर्तास मनाई आदेश द्यावा, तसेच विमानतळ कारखान्याच्या जागेत घुसून व नुकसान करून बांधकाम करीत आहे, त्याला तूर्तास मनाई आदेश करावा म्हणून सिध्देश्वर साखर कारखान्याकडून दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर जहागिरदार यांच्या न्यायालयात दावा दाखल केला आहे. याच्या सुनावणीवेळी न्यायालयाने सरकारी पक्षाला नोटीस काढून म्हणणे मांडण्यास सांगितले होते. 30 मार्च रोजी सरकारी पक्षाने न्यायालयात हजर होऊन म्हणणे मांडण्यासाठी 1 एप्रिलपर्यंत वेळ घेतला होता. त्यानुसार न्यायालयाने सरकारी पक्षाला वेळ दिला होता.
सोमवारी दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर श्रीमती जवादवाड यांच्यासमोर याची सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने साखर कारखान्याच्या तूर्तास मनाई देण्याचा अर्ज नामंजूर केला असून याची पुढील सुनावणी 5 एप्रिल रोजी होणार आहे. साखर कारखान्याने शासन आदेशाविरुध्द दाद मागितली नाही, शासन आदेश पालन करीत असून कारखान्याचा मनाई अर्ज चुकीचा आहे असा युक्तीवाद सरकारी वकिलांनी केला. तो मान्य करीत न्यायालयाने कारखान्याचा तूर्तास मनाई देण्याचा अर्ज नामंजूर केला.
याप्रकरणी सरकारच्यावतीने अॅड. शितल डोके, सोलापूर विमानतळाच्यावतीने अॅड. अश्लेष देशपांडे यांनी तर सिध्देश्वर साखर कारखान्याच्यावतीने अॅड. निलेश ठोकडेे यांनी काम पाहिले.
…………………………………………………………..