
सोलापूर : राज्यातील नऊ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात महापालिकेच्या आयुक्त शितल तेली यांची बदली झाली असून त्यांच्या जागी धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त शीतल तेली यांची बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्यांच्या जागी धाराशिवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विशेष म्हणजे धाराशीवच्या जिल्हाधिकारीपदीही अद्याप कोणाची नियुक्ती झालेली नाही. आयुक्त तेली यांची बदली होणार याची बऱ्याच दिवसापासून चर्चा होती. विधानसभा निवडणुकीच्या वेळेस स्थानिक आमदार त्यांच्या कारभारावर नाराज झाले होते. त्यांच्याविरुद्ध मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यांनी जाहीर केलेल्या शहर विकास आराखड्यावर बरेच आक्षेप आले आहेत. याशिवाय शहर वगळता हद्दवाढ भागाकडे त्यांनी कधीच पाहिले नसल्याचा आरोप होत होता. आगामी काळात महापालिकेची निवडणूक लागणार असल्यामुळे त्यांची थोड्याच दिवसात बदली होणार हे निश्चित होते. त्यानुसार तेली यांची बदली झाली असून अद्याप त्यांना कोठेच नियुक्ती दिली नसल्याचे सांगण्यात आले. नूतन आयुक्त ओंबासे यांना आता महापालिका निवडणुकीला लवकरच सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या विकास कामांना मिळते जुळते घेऊन शहर विकासाची महत्त्वाची भूमिका त्यांना पार पाडावी लागणार आहे.