
सोलापूर : आपल्या ज्ञात उत्पन्न स्तोत्राच्या 57% अधिक म्हणजे दोन कोटी ५४ लाखाची बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे (55, शाकुंतल निवास, कोणार्क नगर, विजापूर रोड सोलापूर ) यांच्या विरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक गणेश कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता असताना राजकुमार कांबळे यांनी भ्रष्ट मार्गाने आपल्या व कुटुंबीयांच्या नावाने मोठी संपत्ती जमा केली. याबाबत तक्रार आल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी त्यांची चौकशी सुरू केली. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे तत्कालीन पोलीस उपाधीक्षक अरुण देवकर, जगदीश भोपळे, अजितकुमार जाधव, संजीव पाटील व गणेश कुंभार यांनी त्यांनी जमा केलेल्या बेहिशोबी मालमत्तेची चौकशी केली. यात कांबळे यांनी स्वतः व कुटुंबीयांच्या नावे दोन कोटी 54 लाख 18 हजार किमतीची बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचे आढळून आले. त्यानुसार भीमा कालवा मंडळाचे तत्कालीन अधीक्षक अभियंता राजकुमार कांबळे यांच्याविरुद्ध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास फौजदार पिंगूवाले करीत आहेत.