
सोलापूर: स्त्री शिवाय कुटुंब किंवा परिवाराची कल्पना करता येत नाही. विवाहाच्या माध्यमातून स्त्री दोन कुटुंबातील दुवा म्हणून काम करते, योगदान देते. पिंपोडकर-डोईफोडे-माने- क्षीरसागर (पिंडोमाक्षी) या चार कुटुंबातील कन्यांनी आपापल्या परीने हे परिवार उजळवले आहेत.
प्राचीन काळात पाच पिढ्याही एकत्रित वावरताना दिसायच्या. आता अलीकडच्या काळात चार पिढ्या एकत्र दिसणे दुर्मिळ होत चालले आहे. जागतिक कुटुंब दिनाच्या पार्श्वभूमीवर सरस्वती, शालन, ज्योती, रुचिता या पणजी ते पणती अशा चार पिढ्यांच्या चौकडीचे टिपलेले छायाचित्र लक्षवेधक आहे.
भारतात प्राचीन काळापासून पितृसत्ताक आणि मातृसत्ताक कुटुंबपद्धती अस्तित्वात आहेत. काळाच्या ओघात मात्र मातृसत्ताक पद्धती मागे पडली. पितृसत्ताक कुटुंबात खापरपणजोबा ते परतुंडे अशा पाच पिढ्याही दिसून यायच्या. एकत्रित कुटुंबात पणजी-पणजोबा, सख्खे व चुलत आजी-आजोबा, त्यांची मुले म्हणजे आई-बाबा, चुलती-चुलते, चुलत भावंडे यासह मोठी सदस्य संख्या असायची. आता व्यक्तींचे आयुर्मान बदलल्याने चार पिढ्याही एकत्रित दिसणे दुर्मिळ होऊ लागले. तर विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबा आणि नातवंडे ही एकत्रित असणे कमी होत चालले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाने प्रसिद्ध केलेल्या २०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार भारतात ३३ कोटी ८ लक्ष ३६ हजार कुटुंबे आहेत. तर महाराष्ट्रात ग्रामीण भागात १ कोटी ३२ लाख १५ हजार आणि शहरी भागात १ कोटी १२ लाख ७ हजार अशी एकूण २ कोटी ४४ लाख २२ हजार इतकी कुटुंब संख्या आहे. खेडेगावात चालणाऱ्या वार्षिक यात्रेच्या एकमेव निमित्ताने नोकरी-धंद्याच्या निमित्ताने दुरावलेले नातेवाईक व भावकी भेटताना दिसतात. स्त्रीकडील माहेरच्या नात्यातील व्यक्ती सणावाराला आणि सुखदुःखाच्या प्रसंगी एकत्र येतात. हल्लीच्या काळात लहान मुलांना पणजोबा किंवा पणजी भेटणे हे दुरापास्त होत चालले आहे.
पिंपोडे बुद्रुक (ता. कोरेगाव जि. सातारा) येथील सरस्वती पिंपोडकर ही वामन आणि अनुसया यांच्या सात अपत्यांपैकी चौथे अपत्य. नारायण, यमुना, विनायक, सरस्वती, रमेश, दत्तात्रय आणि सुमन या सात भावंडांपैकी सरस्वती (सरुबाई) यांचे वय ८५ वर्षे आहे. यातील सरुबाईसह चौघे हयात आहेत. सरुबाई यांचा विवाह पिंपरे खुर्द (ता. पुरंदर जि. पुणे) येथील नारायण डोईफोडे यांच्या सोबत झाला. त्यांना रमेश, शिवाजी ही दोन मुले व मालन, शालन, सुशीला आणि सुनीता या ४ मुली अशी सहा अपत्ये. सरस्वती यांचे पती नारायण हे वडिलोपार्जित छोटा व्यवसाय करायचे. सरुबाई यांनी मात्र अल्पशा शेतीत खस्ता खाऊन कुटुंबाला हातभार लावला.
सरुबाई यांची कन्या शालन हिचा विवाह वडगाव निंबाळकर (ता. बारामती) येथील अरविंद माने यांच्याशी झाला. ते मुंबई येथील कोहिनूर मिलमध्ये कामगार होते. ८० च्या दशकात सततच्या संपामुळे ही मिल बंद पडल्याने या दांपत्याने मुंबई सोडून गावचा रस्ता धरला. त्यांना रेश्मा,ज्योती, विश्वनाथ, गौरव ही चार अपत्ये. गावी असलेल्या अल्पशेतीत कुटुंबाची गुजराण अशक्य होती. त्यामुळे शालन यांनी पतीबरोबर मिळेल ते काम करून, शेतमजुरी असे काबाडकष्ट करून घर चालवले. शालन यांचे वय ६० वर्ष असून मुलांसह हे कुटुंब बारामती स्थलांतरित झाले आहे.
शालन यांची कन्या ज्योती हिचा विवाह टोणेवाडी (ता. बार्शी जि.सोलापूर) येथील क्षीरसागर कुटुंबातील राजेश यांच्याशी झाला. कुटुंबातील ज्योती हे दुसरे अपत्य असूनही त्यांनी माहेरी असताना वडगाव- निंबाळकर येथे वडीलधाऱ्याची भूमिका बजावली. आई-वडिलांना कष्टप्रद जीवनात स्वतः राबून मोलाची साथ तर दिलीच, शिवाय कुटुंबात ज्योती यांना सर्वप्रथम नोकरी मिळाली. त्यानंतर ज्योती हीच कुटुंबाची आधारस्तंभ बनली. सध्या ज्योती (वय ३९) बारामती येथील महिला शासकीय रुग्णालयात कार्यरत आहेत.
रुचिता (वय१०) ही ज्योती यांचे एकमेव अपत्य. घरातच सामाजिक कार्याचे बाळकडू मिळाल्याने वयाच्या पाचव्या वर्षापासूनच सामाजिक उपक्रमात सक्रिय सहभाग घेत आहे. कोरोना काळातील जनजागृती, गायनातून साक्षरतेचा प्रचार, प्रदूषणमुक्तीसाठी सामाजिक संदेश असे छोटे-मोठे उपक्रम करीत असते. साक्षरता प्रचारातील कार्यामुळे तिने परिवाराचा नावलौकिक राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवला आहे. जागतिक कुटुंब दिनाच्या पार्श्वभूमीवर या चौघी एकत्र आल्यानंतर त्यांनी आजवरच्या जीवनकार्याला उजाळा दिला.