
सोलापूर: पालकमंत्री झाल्यावर चंद्रकांत पाटील हे रविवारी सायंकाळी पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले असता भीम आर्मीच्या कार्यकर्त्याने त्यांच्या अंगावर शाई फेकून राज्य शासनाच्या खाजगीकरणाला विरोध केला.
राज्यात सत्तेवर असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने आता मुंबई पोलीस दलातील खाजगी पोलीस नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे इतर विभागातही अशाच नियुक्त्या सुरू केल्यामुळे तरुणाई मध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. शासनाच्या खासगीकरणचा विरोध करत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पाटील यांना काळे झेंडे दाखवले. मोठा पोलीस बंदोबस्त असून देखील भीम आर्मीच्या अजय मैंदर्गीकर याने पालकमंत्री शासकीय विश्राम धाम मध्ये येत असताना अचानक पणे त्यांच्या अंगावर शाई फेकली. यापूर्वी तत्कालीन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही अंगावर शासकीय विश्राम धाममध्ये भंडारा उधळण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर पोलिसांनी पालकमंत्री पाटील यांच्या आगमनावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला होता. शासकीय विश्रामगृह येथे छावणीचे स्वरूप आले होते. स्वतः पोलीस आयुक्त डॉ राजेंद्र माने हे बंदोबस्तावर निगराणी करीत होते. बंदोबस्ताचा असा चक्रव्यूह भेदून भीम आर्मीच्या अजय मैंदर्गीकर याने शाई फेकली. चंद्रकांत पाटील यांच्या पांढऱ्या शर्टवर शाई फेकल्याने एकच गोंधळ निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी तात्काळ अजयला ताब्यात घेतले. हातातील काळे झेंडे दाखवत त्याने निषेध नोंदवला. या प्रकारानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करून वातावरण निर्मिती केली.