अनं..! एसएमटीच्या बसवर “त्यांनी’ टेकवला माथा

सोलापूर : सोलापूर महानगरपालिका परिवहन सेवा अर्थात एसएमटीची बस तुम्हाला आठवते का? ही बस तुम्ही किती दिवसापूर्वी पाहिली आहे. काही आठवत नाही… एकेकाळी सात व आठ नंबरवर इकडून तिकडे फिरणाऱ्या डबल डेकर बसचा हा काळ तुम्हाला आठवत नसेल. पण हा काळ गाजवणारा एक माणूस आज सोलापुरात आला अन त्याने सात रस्ता बस डेपोत थांबलेल्या बसवर आपला माथा टेकवला. सोलापूरची “लक्ष्मी’ अशी थांबलीस का? अशी साद तर त्यांनी घातली नसेल?
सोलापूरच्या सोशल मीडियावर शुक्रवारी सायंकाळी एक फोटो व्हायरल होतोय. सातरस्ता येथील एसएमटीच्या बस डेपोत थांबलेल्या एका बसच्या बॉनेटवर दुचाकीवरून आलेली एक व्यक्ती आपले डोकं टेकवतेय. पांढरी शुभ्र विजार- शर्ट घातलेला कोण हा माणूस? असा प्रश्न अनेकांना पडलेला. बाजूला बसलेले कर्मचारी सावध झाले. अंधारात पुसटश्या विजेच्या प्रकाशातही त्यांनी “त्या’ व्यक्तीला ओळखलं. अरे.. हे तर आपले मदने साहेबच. इतक्या वर्षांनी “त्या’ व्यक्तीला पाहून त्या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. आपला जुना साहेब पुन्हा डेपोत आला हे पाहून त्या कर्मचाऱ्यांनाही गहिवरून आले. साहेब तुम्ही? असा सवाल करताच, त्यांनी आपले हात पसरले. लागलीच त्या कर्मचाऱ्यांनी त्यांची गळा भेट घेतली. साहेब असतानाही कर्मचाऱ्यांप्रती त्यांची ही आपुलकी पाहून, असा साहेब आपल्यासाठी पुन्हा यावा, असे त्यांनाही क्षणभर वाटले. आपल्या जुन्या सवंगड्यांना पाहून त्यांनाही बरे वाटले. ख्याली खुशाली विचारून ते आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले पण सोलापुरात मात्र त्यानंतर एकच चर्चा सुरू झाली. अरे आपले मदने साहेब येऊन गेले.
सोलापुरातील सन 2006 ते 2009 हा काळ कोणी पाहिला असेल तर त्यांना दोन व्यक्तींचे नाव आजही आवर्जून आठवते. शहीद पोलीस आयुक्त अशोक कामटे अन दुसरे डेप्युटी आरटीओ राजेंद्र मदने. हे दोन अधिकारी रस्त्यावर दिसले की कायदा व सुव्यवस्था आणि सुरक्षित वाहतूक काय असते याची आठवण सोलापूरकरांना झाल्याशिवाय राहत नाही. कामटे आज आपल्यात नाहीत पण मदने यांनी शुक्रवारी सोलापूरला धावती भेट दिली. शासकीय विश्रामगृहावर त्यांचे स्वागत ज्येष्ठ पत्रकार अविनाश कुलकर्णी, राजकुमार सारोळे, विनायक होटकर, शिवाजी सुरवसे, फोटोग्राफर यशवंत सादुल यांनी केले.सोलापुरातील जुन्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला. राजेंद्र मदने यांनी सातरस्ता येथील परिवहन बस डेपोला भेट देऊन कर्मचाऱ्यांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी डेपोत थांबलेल्या बसला नमन केले. कर्मचाऱ्यांनी काढलेला हा फोटो सोलापुरात चांगलाच व्हायरल झाला आहे.
परिवहन व्यवस्था सुधारण्यासाठी मदने यांनी मोठे योगदान दिले होते. भंगारात पडलेल्या बसला नवीन रुपडे त्यांनी दिले होते. तोट्यातील परिवहन व्यवस्थेला उर्जित अवस्था आणली होती. सोलापुरातून त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा परिवहन सेवेला वाईट दिवस आले. आज परिवहनची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. सोलापुरातून मुंबईला बदली झाल्यानंतर मदने यांना आजार झाला होता. या आजारातून ते सुखरूप बाहेर पडले. सोलापूरकरांच्या आशीर्वादामुळेच हे घडले अशी त्यांची आजही भावना आहे. त्यामुळे सोलापूरकरांच्या आस्थेसाठी ते सोलापुरात आले होते. जीएम ग्रुपचे बाळासाहेब वाघमारे यांनी त्यांची आग्रहाने भेट घेत जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचा सन्मान केला. यावेळी त्यांचे जुने सहकारी माजी परिवहन व्यवस्थापक ए. ए. पठाण, तिकीट निरीक्षक भरत कंदकुरे उपस्थित होते.