पंढरपूर अर्बन बँकेच्या मॅनेजरने ढापले 9 कोटी

सोलापूर : बारामतीतील पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या मॅनेजरने नऊ कोटी ढापल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
याप्रकरणी पंढरपूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बारामती शाखेचा तत्कालीन मॅनेजर अमित प्रदीप देशपांडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पंढरपूर अर्बन कॉपरेटिव्ह बँकेचे कृष्णकुमार पेंडल यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून बारामती शाखेचा तत्कालीन व्यवस्थापक अमित देशपांडे (राहणार सहयोग सोसायटीसमोर,बारामती) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सप्टेंबर 2023 ते नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. मॅनेजर देशपांडे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत लिपिक साधना कळंत्रे यांचा पासवर्ड वापरून, बनावट कागदपत्राच्या आधारे बँकेची वेळोवेळी फसवणूक केल्याची बाब निदर्शनास आल्यानंतर ही तक्रार देण्यात आली आहे. मॅनेजर देशपांडे याने बँकेच्या खात्यातून अडीच कोटी रुपये अधिकार नसताना काढले. तसेच पंढरपूर बँकेमधील 31 लाख रुपये काढून ते बँक ऑफ बडोदा मध्ये न भरता परस्पर त्याची विल्हेवाट लावली आहे. याशिवाय मॅनेजर देशपांडे यांनी बँकेतून दोन कोटी तीस लाखाची उचल घेऊन ते धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेत स्वतःच्या खात्यात ठेवले. या पतसंस्थेत देशपांडे यांनी वेगवेगळ्या नावाने पाच बनावट खाते उघडून या खात्यात बँकेतील तीन कोटी 23 लाख रुपयांची रक्कम परस्पर ठेवली. याशिवाय पंढरपूर अर्बन बँकेच्या 83 ग्राहकांनी बँकेत तारण म्हणून ठेवलेले सोन्याचे दागिने काढून त्या जागी बनवट दागिने ठेवले. ग्राहकाचे दागिने बाहेर गहाण ठेवून त्यावर परस्पर कर्ज उचलले. बँकेची नऊ कोटी तीन लाखाला फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. पंढरपूर अर्बन बँकेतील हा घोटाळा उघड झाल्यानंतर ठेवीदारांमध्ये घबराट पसरली आहे. अशा घोटाळ्यांमध्ये सोलापुरातील अनेक नामांकित बँका बुडाल्या आहेत. यात ठेवीदारांची मोठी रक्कम अडकली आहे. यामुळे ठेवेदारांचे काळजी वाढली आहे. बँकेचे अध्यक्ष मुळे यांनी मात्र बँकेच्या व्यवहारावर कसलाच परिणाम नसल्याचा खुलासा केला आहे. बँकेच्या 30 शाखा असून 2500 कोटी होऊन अधिक उलाढाल आहे. त्यामुळे ठेवीदाराने चिंता करू नये असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान सोलापूर मार्केट यार्ड शाखेतील मॅनेजर पाठक यांनी फसवणूक केल्याची तक्रार एका कर्जदाराने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे. बारामती शाखेनंतर सोलापूर शाखेतील ही तक्रार पुढे आल्यामुळे पंढरपूर अर्बन बँकेबाबत हा चर्चेचा विषय बनला आहे.