झेडपीच्या कन्नड शाळांवर मराठी शिक्षकांची नियुक्ती
कर्नाटकच्या सीएमकडे मांडली कैफियत

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील कन्नड माध्यमाच्या शाळांवर मराठी शिक्षकांची नियुक्ती केल्यामुळे प्रश्न गंभीर बनला आहे. संबंधित शाळांमधील पाल्यांच्या पालकांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडे कैफियत मांडली आहे. त्यामुळे हा वाद चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने गेल्या महिन्यात पोर्टलद्वारे जिल्हा परिषद शाळांकडे रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांची नियुक्ती जाहीर केली आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेकडे काही शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. यातील 38 शिक्षकांची भाषा विषयावर नियुक्ती आहे सोलापूर जिल्हा परिषदेकडे उर्दू व कन्नड माध्यमांच्या ही शाळा आहेत कर्नाटक सीमावृत्ती भागात असलेल्या अक्कलकोट तालुक्यात कन्नड शाळांची संख्या जास्त आहे या शाळांवर आता मराठी व इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्त झालेले शिक्षक विदर्भ, कोकण, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या शिक्षकांना कन्नड व उर्दू माध्यमांच्या शाळांवर नेमणूक मिळाल्याने त्यांना या भाषेतून शिक्षण देणे अवघड झाले आहे. बरेच शब्द माहित नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवताना अडचणी निर्माण होत आहेत. वास्तविक या शिक्षकांना प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी नियुक्ती देण्यास हरकत घेतली होती. या शिक्षकांनी शिक्षण आयुक्त व शासनाकडे तक्रार करून मार्गदर्शन घेतले. शासनाकडून मार्गदर्शन आल्यावर या शिक्षकांना नियुक्ती देण्यात आली आहे. पण आता प्रत्यक्ष कन्नड शाळांवर हे शिक्षक गेल्यावर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. अक्कलकोट तालुक्यातील कन्नड शाळांना अल्पसंख्यांक दर्जा आहे. त्यामुळे या शाळांवरील कन्नड भाषा संवर्धनासाठी कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र शासनाला अनुदान दिले जाते. रिक्त झालेल्या कन्नड शिक्षक जागेवर मराठी शिक्षक दिल्याने अडचणी निर्माण झाल्याने येथील पालकांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून कैफियत मांडली आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न अडचणीचा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा परिषद शिक्षण विभाग या प्रश्नाकडे कोणत्या भूमिकेतून पाहत आहे यावरून पुढील बाबी ठरणार आहेत. एकीकडे कन्नड व उर्दू शाळांना शिक्षक मिळत नव्हते आणि आता मिळाले तर ही अडचण निर्माण झाली आहे.