
सोलापूर : पर्यवेक्षकीय यंत्रणेने केवळ प्रशासकीय कामांपुरते मर्यादित न राहता शाळांना भेटी देऊन शिक्षकांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करावे, असे आवाहन शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी केले.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार ५ सप्टेंबर २०२६ पासून राज्यभरात सुरू झालेल्या ‘चला, शाळेत जाऊया’ अभियानाची सोलापुरात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण विभागाची विशेष कार्यशाळा सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज येथे उत्साहात पार पडली. जिल्ह्यातील प्रत्येक शाळा अधिक सक्षम, सुरक्षित आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला.पुणे शिक्षण आयुक्तालयाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यशाळेत शाळांमधील भौतिक सुविधा आणि शैक्षणिक गुणवत्तेचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
मूलभूत सुविधांवर भर
शाळांमध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी, स्वतंत्र स्वच्छतागृहे, दिव्यांगस्नेही सुविधा, संरक्षक भिंत, पुरेशा वर्गखोल्या, वीज आणि विज्ञान प्रयोगशाळा प्राधान्याने उपलब्ध करण्याचे निर्देश दिले.
समन्वय व नियोजन
डॉ. महेश पालकर यांनी शिक्षण व्यवस्थेतील विविध घटकांनी समन्वयाने काम करण्याचे अधोरेखित केले तर डॉ. इब्राहिम नदाफ यांनी सर्वेक्षणातील माहितीच्या आधारे गुणवत्तेसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे सांगितले.या कार्यशाळेला शिक्षणाधिकारी सचिन जगताप, विशाल मुळे, सुमित शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी या वेळी उपस्थित होते.
आता पट नव्हे गुणवत्ता
आता शाळांची केवळ उपस्थिती न वाढवता शाळांचा एकूण दर्जा उंचावणे हेच या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे.
शाळांना मार्गदर्शनही करा
शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे म्हणाले
पर्यवेक्षकीय यंत्रणेने केवळ प्रशासकीय कामकाजापुरते मर्यादित न राहता शाळांना नियमित भेटी द्याव्यात, तेथील शैक्षणिक गरजा समजून घ्याव्यात आणि शिक्षक व शाळांना आवश्यक मार्गदर्शन करावे.शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी शाळांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण व्यवस्थेतील विविध घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज अधोरेखित केली. शिक्षण उपसंचालक डॉ. इब्राहिम नदाफ यांनी विविध शैक्षणिक सर्वेक्षणांमधून मिळणाऱ्या आकडेवारीचे केवळ संकलन न करता, त्या माहितीच्या आधारे शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता व्यक्त केली.‘शाळेची गुणवत्ता ही सामूहिक जबाबदारी’कार्यशाळेत “शाळेची गुणवत्ता ही एका व्यक्तीची नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची सामूहिक जबाबदारी आहे,” या भूमिकेतून जिल्ह्यातील प्रत्येक शाळा अधिक सक्षम, सुरक्षित, गुणवत्तापूर्ण आणि विद्यार्थी-केंद्रित करण्याचा संकल्प करण्यात आला.या कार्यशाळेस शिक्षणाधिकारी सचिन जगताप, विशाल मुळे, सुमित शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.‘चला, शाळेत जाऊया’ अभियानाच्या माध्यमातून केवळ विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढविणे नव्हे, तर शाळांचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांना सुरक्षित, आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचे मोठे उद्दिष्ट सोलापूर शिक्षण विभागाने समोर ठेवले आहे.



