गुणवत्तापूर्ण विकासकामे, सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अभियंत्यांचे योगदान महत्वाचे

सोलापूर : भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या १६५ व्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेत आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती सभापती इंद्रजीत पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता असिफ खैरदी, बांधकाम विभाग क्र. २ चे प्रभारी कार्यकारी अभियंता अतुल लेंडवे, लघुपाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेडगिरे, कार्यकारी अभियंता पंकज लेंडे, अभियंता संघटनेचे राज्य सहसचिव रविशंकर बोधले, जिल्हा उपाध्यक्ष राम जेऊरे, अभियंता पतसंस्थेचे चेअरमन विलासकुमार कोंडगुळे यांची उपस्थिती होती.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व अभियंता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ग्रामीण विकासाच्या प्रक्रियेत अभियंता वर्गाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असून, गुणवत्तापूर्ण विकासकामे आणि सक्षम पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अभियंत्यांनी आपले योगदान असेच पुढे सुरू ठेवावे, असा संदेश त्यांनी यावेळी दिला.
उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ व बांधकाम समिती इंद्रजीत पवार यांनीही उपस्थित सर्व अभियंता अधिकारी व कर्मचाऱ्यांना अभियंता दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, तंत्रज्ञान, गुणवत्ता, प्रामाणिकपणा आणि विकासाची बांधिलकी जपत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचा संदेश या अभियंता दिनाच्या कार्यक्रमातून देण्यात
आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बांधकाम क्रमांक 1 च्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले



