विश्लेषणात्मक पत्रकारिता काळाची गरज: सीईओ मनीषा आव्हाळे
सोलापूर झेडपी प्रशासनातर्फे पत्रकारांचा सन्मान

सोलापूर : साधना व संकल्पना तडीस नेण्यासाठी आपल्यासमोर व्हिजन असायला हवे, नाहीतर आपला मार्ग भरकटतो. पत्रकारितेचे व्रतही तसेच आहे. एकांगी पत्रकारिता काळाआड झाली आहे. एखाद्या विषयाचा अभ्यास करून विश्लेषणात्मक पत्रकारिता आज काळाची गरज बनली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी केले.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्रशासनातर्फे जिल्हा परिषद बीटवरील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे या बोलत होत्या. याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, खराडे उपस्थित होते. प्रारंभी मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांच्याहस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. सन्मानाला उत्तर देताना ज्येष्ठ पत्रकार शिवाजी सुरवसे यांनी जिल्हा परिषद म्हणजे मिनी मंत्रालय आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी शासन अनेक योजना राबवीत असते. या योजनांची अंमलबजावणी जिल्हा परिषद करत असताना विकासात्मक पत्रकारितेला मोठा वाव असल्याचे सांगितले. शरीफ सय्यद यांनी प्रशासन व पत्रकारितेच्या समन्वयामुळे गरिबा पर्यंत योजना पोहोचण्यास मदत होते असे सांगितले. विनोद कामतकर यांनी जिल्हा परिषदेच्या योजना सोप्या भाषेत लोकांसमोर नेण्याचे पत्रकार काम करतात. त्यामुळेच नव्या योजनांची अंमलबजावणी करणे प्रशासनाला सोपे जाते असे स्पष्ट केले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनीही मनोगत व्यक्त केले.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मार्गदर्शन करताना राज्यसेवा परीक्षेचा अभ्यास करतानाच्या आठवणी सांगितल्या. अभ्यासाचा पहिला मुद्दा स्वातंत्र्यकाळात माध्यमाची काय भूमिका होती? हा असायचा याचा. दर्पण वृत्तपत्राची त्यावेळी गरज होती. स्वातंत्र्यविषयी लोकांना जागृत करण्याचे काम या माध्यमाने केले. पण आज स्वातंत्र्यानंतरचा विचार केल्यास विकास घडवून आणणे हा पत्रकारितेचा मूळ उद्देश असल्याचे दिसून येईल. यासाठी आपण खेड्यापाड्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचतो याचे आत्मचिंतन करणे गरजेचे झाले आहे. पत्रकार हा सतत जनमानसात संपर्कात असतो. त्यामुळे जनमानसातून येणारा फीडबॅकवरून त्याची पत्रकारिता उमटत असते. विकास घडविणे हा पत्रकार व प्रशासनाचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे ही दोन्ही चाके समन्वयाने चालणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले. शेवटी जिल्हा परिषद पत्रकार संघाचे अध्यक्ष बळीराम सर्वगोड यांनी आभार मानले.