
- सोलापूर : राज्यातील सत्ताधारी असलेल्या मंत्रिमंडळाचे दहा आमदार सोलापूर जिल्ह्यात असूनही जिल्हा व महिला बाल रुग्णालयाचे उद्घाटन रखडले आहे.
सोलापूर शहर व जिल्ह्यासह लातूर, धाराशिव, पुणे जिल्ह्याचा काही भाग आणि कर्नाटकाच्या सीमावृत्ती जिल्ह्यांतील नागरिकांच्या आरोग्याचे काळजी घेणाऱ्या शासकीय रुग्णालयावर मोठा भार आहे. कोरोना काळात या रुग्णालयाने मोठी सेवा बजावली आहे. पण शासकीय रुग्णालयावर वाढलेला लोड पाहता महिला व बालकांसाठी एक वेगळे रुग्णालय असावे म्हणून तत्कालीन पालकमंत्री व विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रयत्न करून महिला व बाल रुग्णालयाला मंजुरी आणली. नोव्हेंबर 2019 मध्ये या रुग्णालयाला मंजुरी मिळाली व गुरुनानक चौकातील जुन्या मेडिकल कॉलेजच्या आवारात या रुग्णालयाची उभारणी सुरू झाली. इमारत उभी होऊन वर्ष होत आले आहे. आतील फर्निचर व लिफ्टचे काम रखडले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने डॉक्टर व कर्मचारी भरतीची तयारी पूर्ण केली आहे. पण रुग्णालयातील अंतर्गत सुविधांसाठी मोठा निधी हवा आहे. या रुग्णालयाच्या उद्घाटनासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर मंत्र्यांची वेळ मागितली पण मंत्र्यांना वेळ नसल्याने या रुग्णालयाचे उद्घाटन रखडल्याचे सांगण्यात येत आहे.
आरोग्यमंत्र्यांचेही दुर्लक्ष
आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत जिल्ह्यातीलच आहेत. पण त्यांनीही या रुग्णालयाचे उद्घाटनाकडे कानाडोळा केल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातील दहा आमदार सत्ताधारी पक्षातील आहेत. पण त्यांनीही या रुग्णालयाची गरज पटवून सांगितलेली दिसत नाही. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच जबाबदारी घेतली आहे. पण जबाबदारी मिळाल्यापासून एकदाच सोलापुरात येऊन त्यांनी आढावा घेतला आहे. सोलापूर जनतेच्या या रुग्णालयाचे कामकाज तातडीने सुरू होणे गरजेचे असल्याचे मत लोकांमधून व्यक्त होत आहे. पण आमदार विजयकुमार देशमुख यांनी मंजुरी आणली म्हणून या रुग्णालयाच्या कामकाज सुरू होण्याकडे कोणी लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे.