झेडपीच्या 319 कंत्राटी डॉक्टरांना नाही तीन महिन्यापासून मानधन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांना सेवा देणाऱ्या 319 समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना गेल्या तीन महिन्यापासून पगार नसल्यामुळे अडचण निर्माण झाली आहे.
झेडपीच्या आरोग्य विभागामार्फत 78 आरोग्य केंद्र व त्या अंतर्गत उपकेंद्रांचे कामकाज चालते. या आरोग्य केंद्रावर ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांच्या आरोग्याचे काळजी घेण्यासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत 319 कंत्राटी डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात सतत हवामानात बदल होत असल्याने साथीचे रोग वाढले आहेत अशा परिस्थितीत हे कंत्राटी डॉक्टर आरोग्य केंद्रावर लोकांच्या आरोग्याचे काळजी घेण्यासाठी सेवा देत आहेत असे असताना गेल्या तीन महिन्यात या डॉक्टरांचा पगार झालेला नाही वास्तविक मार्च अखेर विविध योजनांसाठी झालेला खर्च व पगारासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी येतो त्यातून हा प्रश्न मार्गी लागणे अपेक्षित होते पण आता एप्रिल महिना सुरू झाला तरी या डॉक्टरांचा मानधनाचा पत्ता नसल्याचे दिसून आले आहे विशेष म्हणजे या डॉक्टरांच्या मानधनाचा फरक ऑगस्ट 2023 मध्ये देण्यासाठी शासनाने सूचना दिलेल्या आहेत. परंतु जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अद्यापही त्यांचे मानधन फरक अदा केलेले नाही. तसेच मागील तीन महिन्याचे वेतनही केलेले नाही. यामुळे समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामध्ये प्रचंड आक्रोश सुरु झाला आहे. अनुदान असतानाही जिल्हा लेखा व्यवस्थापक यांनी मानधन अदा केलेले नाही व अनुदान संपल्यानंतर आता ओरड सुरू झाल्याच्या तक्रारी समुदाय अधिकाऱ्यांनी केल्या आहेत. महाराष्ट्रातील इतर सर्व जिल्ह्यांमध्ये अनुदानाचा फरक दिला गेलेला आहे व नियमित वेतन होत आहे असे असताना जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी या प्रश्न लक्ष घालून समुदाय अधिकारी व आशा वर्करचे मानधन वेळेत जमा होईल, याची काळजी घ्यावी अशी मागणी होत आहे.
माझा विषय नाही…
हा जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापकाचा विषय आहे. माझा संबंध येत नाही. तरी आरोग्य विभागाने 24 कोटींची मागणी केली होती पण केंद्र शासनाकडून पाच कोटीच आले आहेत. उर्वरित अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वैशाली थोरात यांनी दिली.