सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूर जिल्ह्यात चार गावांना टँकरने पाणीपुरवठा

टंचाई काळासाठी 1241 टँकरसाठी 44 कोटीचे नियोजन

सोलापूर : जिल्ह्यात रब्बी ज्वारीच्या काढणीची लगबग सुरू असतानाच उन्हाचा कडाका जाणवू लागला असून सद्यस्थितीत माळशिरस तालुक्यातील दोन व करमाळा आणि माढा तालुक्यातील प्रत्येकी एक अशा चार गावात टँकरने पाणीपुरवठा सुरू असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी बुधवारी दुष्काळी परिस्थितीतील पाणीटंचाई व जलजीवन मिशन योजनेच्या कामाचा आढावा घेतला. टंचाई काळासाठी पाणी टंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. पाणीटंचाई निवारणासाठी ऑक्टोबर 2023 ते जून 2024 पर्यंतच्या आराखड्यास जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंजुरी दिली आहे. या आराखड्यात नऊ उपायोजना सुचविल्या आहेत.  त्यासाठी 55 कोटी 62 लाखाच्या किमतीचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये 1241 टँकरसाठी 43 कोटी 85 लाख इतका निधी लागणार आहे. टंचाई स्थितीमुळे गावांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. सद्यः स्थितीत माळशिरस तालुक्यातील पिंपरी, भांब व करमाळा तालुक्यातील घोटी, माढा तालुक्यातील तुळशी अशा चार गावांना टँकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे.

जल जीवन हा केंद्र शासनाचा महत्त्वकांक्षी कार्यक्रम आहे. हर घर नल से जल योजनेतून प्रत्येक घरास नळाद्वारे 55 लिटर प्रतिमाणशी प्रतिदिन पाणीपुरवठा करण्याचे प्रस्तावित आहे. जल जीवन साठी चालू वर्षासाठी 834 कोटीच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्ह्यात 5 लाख 76 हजार 691 कुटुंबापैकी डिसेंबर 23 अखेर 5 लाख 62 हजार 888 कुटुंबांना नळ जोडण्याच्या संकेतस्थळावर नोंदी करण्यात आल्या आहेत. चालूवर्षी 75 हजार 314 नळ जोडण्याचे उद्दिष्ट असून त्यापैकी 61 हजार 644 जोडण्या देण्यात आल्या आहेत. जलजीवन मिशन योजनेत झेडपीच्या आराखड्यात 855 योजनांचा समावेश असून या सर्व योजनांच्या निविदा व कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. यातील 101 कामे पूर्ण झाले असून उर्वरित कामे प्रगतीपथावर आहेत. या योजनेसाठी केंद्र व राज्याच्या वाट्यातील 124 कोटी 77 लाख कोटी निधी प्राप्त झाला आहे. यातील 119 कोटी 15 लाख खर्च झालेले आहेत.

चालू वर्षात 834 कोटीचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. हर घर नल से जल नळ जोडण्यासाठी 374 कामे मंजूर असून सद्यस्थितीत प्रशासकीय मान्यता घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.  चालू आर्थिक वर्षात 154 कामे नव्याने घेण्यात आली असून त्यातील 152 कामे प्रगतीपथावर आहेत.  इलेक्ट्रिशियनअंतर्गत 423 कामात शासनस्तरावरून मान्यता मिळाली असून 160 कामे पूर्ण करण्यात आली आहेत.  जलजीवन योजनेतून 24 कामांना सोलार पंपाद्वारे पाणीपुरवठा करण्यास मान्यता मिळाली असून त्यातील 13 कामे पूर्ण आहेत तर 4 कामे रद्द करण्यात आली आहेत. नमामी योजनेअंतर्गत तीन कामास मान्यता मिळाली असून ही कामे प्रगतीपथावर आहेत.  मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत आराखड्यात 27 कामांचा समावेश असून त्यापैकी 26 कामे पूर्ण झाली आहेत.  एक काम रद्द झाले आहे. राष्ट्रीय ग्रामीण पेय जल योजनेतून 199 योजनांचा समावेश केला असून त्यातील 194 योजनांची कामे पूर्ण झाली आहेत, असे मुख्य कार्यकारी अधिकारी आव्हाळे यांनी सांगितले. टंचाई काळात कोणतीही अडचण भासणार नाही,  असे कामाचे नियोजन करा अशा अधिकाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button