दिल्लीतील अमृतवाटिकेसाठी सोलापूरची माती रवाना
गावागावातून संकलन केलेल्या अमृत कलशला जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविला हिरवा झेंडा

-
सोलापूर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान सुरू आहे. या अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या अंतर्गत 11 पंचायत समितीचे अकरा कलश, सोलापूर महानगरपालिकेचा एक कलश व जिल्हा नगरपालिका प्रशासनचा एक कलश अशा पद्धतीने एकूण 13 अमृत कलश घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकाच्या वाहनाला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे यांच्यासह अन्य मान्यवर व नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक उपस्थित होते.
या अभियानाची सुरुवात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते करण्यात आली. देशासाठी बलिदान दिलेले शहीद जवानांच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी आणि त्यांना वंदन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असून त्या अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका प्रशासन यांच्या संयुक्त विद्यामाने हा उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात आलेले होते. या अमृत कलश मध्ये सोलापूर महानगरपालिकेचे एक कलश, सोलापूर जिल्ह्यातील 11 पंचायत समितीचे 11 कलश, जिल्हा नगर पालिका प्रशासनाच्या वतीने एक कलश घेऊन जात आहेत. हे सर्व कलश नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक 27 ऑक्टोबर रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सांस्कृतिक कार्य यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमासाठी मुंबईकडे घेऊन जात आहेत. त्यानंतर अंतिम सोहळा 1 नोव्हेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथील कर्तव्यपथावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यांच्याहस्ते अमृतवाटिकेचे उद्घाटन होणार आहे.