ही इमारत; आधी बनली होती हागणदारी, आता होत आहे आरोग्याची सेवा
अक्कलकोटच्या पावन नगरीतील एका दवाखान्याची ही कहाणी

सोलापूर : लाखो रुपये खर्चून अक्कलकोट शहरात उभारण्यात आलेली एक सरकारी इमारत, दुर्लक्षपणामुळे हागणदारी बनली होती. नागरी भागातील लोकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी ‘आपला दवाखाना” सुरू करण्याचा सरकारने निर्णय घेतल्यानंतर या इमारतीकडे अधिकाऱ्यांचे लक्ष गेले अन आता याच इमारतीमधून होत आहे गरीब लोकांच्या आरोग्याची सेवा. तुम्हाला विश्वास बसणार नाही, अशी या इमारतीची कहाणी आहे.
अक्कलकोट शहरात आरोग्य विभागाने लाखो रुपये खर्चून इमारत उभी केली होती पण या इमारतीत काय करायचे यावर निर्णय न झाल्याने ही इमारत धुळखात पडून होती. या सरकारी इमारतीकडे कोणाचेच लक्ष नसल्याने तोडफोड झाली होती. परिसरात झुडपे वाढल्याने लोक शौचालयासाठी येत होते.
अशात सरकारने नागरी भागातील गरीब लोकांच्या सोयीसाठी ‘आपला दवाखाना” सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अधिकाऱ्यांचे या इमारतीकडे लक्ष गेले. इमारतीची रंगरंगोटी व परिसर सुशोभित करून या ठिकाणी नागरी दवाखाना सुरू करण्यात आला आहे. इमारतीचे रूप पालटलेल्या या दवाखान्याच्या उद्घाटनाला तत्कालीन सीईओ दिलीप स्वामी, कलेक्टर मिलिंद शंभरकर व मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी हजेरी लावली होती. आता या दवाखान्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. एकेकाळी दुर्लक्षपणामुळे शौचालय बनलेल्या इमारतीत आज आरोग्याची सेवा होत असल्याने लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
विविध उपक्रम…
आपला दवाखाना या संकल्पनेला वर्ष पूर्ण झाले आहे. पंढरपुरातील सारडा भवन येथील आपल्या दवाखान्याच्या पहिल्या वर्धापन निमित्ताने गरोदर माता तपासणी शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, वैद्यकीय अधीक्षक डॉ महेश सुडके, स्त्री रोगतज्ञ डॉ. स्वाती बोधले, वैद्यकीय अधिकारी डॉ. केंदुळे,डॉ. श्वेता सुडके व इतर कर्मचारी उपस्थित होते.
शासनाने नागरी क्षेत्रातील गरीब लोकांच्या सेवेसाठी आपला दवाखाना सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर जिल्ह्यात 26 दवाखाने मंजूर झाले आहेत. त्यातील 19 दवाखाने सुरू झाले आहेत तर बारा दवाखान्याचे काम प्रगतीपथावर आहे. अक्कलकोट, पंढरपूर येथील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आपला दवाखान्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
डॉ. संतोष नवले,
जिल्हा आरोग्य अधिकारी