सोलापूर झेडपीला मिळाले 40 नवीन अभियंता
मेरिटमध्ये नंबर असतानाही वीस जणांनी मारली नोकरीला दांडी

सोलापूर : जिल्हा परिषदेला नवीन 40 कनिष्ठ अभियंता मिळाले आहेत. सरळ सेवा भरती द्वारे निवड झालेल्या चाळीस जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शुक्रवारी नियुक्त्या दिल्या.
निवृत्तीमुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम, ग्रामीण पाणीपुरवठा व लघु पाटबंधारे विभागाकडे कनिष्ठ अभियंत्याची पदे रिक्त होती. एकाच कर्मचाऱ्यावर दोन दोन तीन तीन तालुक्याचा भार दिला जात होता. शासनाने सरळ सेवा भरती काढली होती. परीक्षाद्वारे साठ पदांसाठी अंतिम निवड यादी जाहीर झाली. कागदपत्र पडताळणीला यातील 40 उमेदवार हजर झाले. पाच उमेदवारांनी तर फोनच उचलले नाहीत. 15 उमेदवारांनी इतर ठिकाणच्या भरतीला प्राधान्य दिल्याचे सांगितले. त्यामुळे झेडपीच्या या तिन्ही विभागाच्या 60 रिक्त जागांपैकी 40 जागांवर नवनियुक्त कनिष्ठ अभियंत्यांना शुक्रवारी समुपदेशनाद्वारे नियुक्त्या देण्यात आल्या. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, संतोष कुलकर्णी यांच्या उपस्थितीत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या देण्यात आल्या. वेटिंग लिस्टमधून उर्वरित 20 जणांना आता संधी मिळणार आहे. कित्येक वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या या तिन्ही विभागाला अभियंते मिळाले आहेत. गेली सहा महिने ही प्रक्रिया सुरू होती.
