सोलापुरात महिला बचत गट शेतकऱ्यांना देणार ड्रोन भाड्याने
महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प; ड्रोनदीदीचे राहणार नियंत्रण

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्यावतीने उमेद अभियानअंतर्गत मंगळवारी सोलापूर जिल्ह्यातील सात तालुक्यांसाठी फवारणीसाठी ड्रोनचे वाटप जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्यात प्रथमच सोलापूर जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यात येत असून यासाठी ‘ड्रोन दीदी’ व ड्रोन सहाय्यक यांनी प्रशिक्षण घेऊन त्याचा वापर ग्रामसंघाच्या उपजिविकेसाठी करून राज्यात सोलापूर जिल्ह्याचा लौकिक वाढवावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की, उमेदच्यावतीने प्रत्येक वर्षी अवजार बँकेतून शेतीसाठी वेगवेगळया प्रकरची अवजारे वाटप करून शेतीच्या माध्यमातुन महिलांची उपजीविकासाठी प्रयत्न केले जातात.
यावेळी बोलताना प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे म्हणाले की कृषी ड्रोनमुळे ग्रामसंघाला एक शाश्वत उत्पन्न मिळेल. तसेच शेतकऱ्यांची वेळेची,पैशाची व औषधाची बचत होऊन खूप मदत होणार आहे. यासाठी ड्रोनदीदीवर ड्रोन सहाय्यक यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, दयानंद सरवळे, राहुल जाधव,मीनाक्षी मडिवली, अनिता माने, शितल म्हांता,तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, योगेश जगताप, कृनाल पाटील, आण्णा आवताडे, योगेश बोडके उपस्थित होते.
ग्राम संघांना सातू ड्रोनचे वाटप
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ,माढा, सांगोला, अक्कलकोट, करमाळा, उत्तर सोलापूर, सांगोला या तालुक्यातील ग्रामसंघांना ड्रोन वाटप करण्यात आले. 70 लाखाचे कर्ज काढून या सात ड्रोनची खरेदी करण्यात आली आहे.