55 रुपयात शर्ट- पॅन्ट कोण शिवून देणार?
शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणे कठीणच

सोलापूर : जिल्हा परिषद.मनपा, नपा प्राथमिक शाळेत यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणे कठीणच आहे. शासन निर्णयानुसार शाळांना गणवेशासाठी कापड मिळणार असून शालेय समितीने विद्यार्थ्यांना शर्ट, पॅन्ट व मुलींना फ्रॉक बचत गटांकडून 55 रुपयात शिवून घ्यायचा आहे.
आत्तापर्यंत जिल्हा परिषदेतील शाळेतील मुलांना गणवेशासाठी अडीचशे रुपये मिळत होते. त्यातून शालेय समिती हा गणवेश खरेदी करत होती. पण शालेय समितीने खरेदी केलेल्या गणवेशाच्या कापडाचा दर्जा उत्तम नसल्याचे कारण पुढे करून हा निर्णय रद्द करण्यात आला. त्यानंतर शासन स्तरावर सर्व शाळांना गणवेशासाठी चांगले कापड पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेशाचे कापड देण्याची योजना आहे. त्याचबरोबर शालेय समितीकडे दोन्ही गणवेशाच्या शिलाईसाठी 110 रुपये जमा करण्यात येणार आहेत. पण इतक्या कमी दरात शिलाई होणे अशक्य असल्याचे मत शाळांच्या मुख्याध्यापकांचे आहे. ग्रामीण भागातील बचत गटाला काम मिळावे अशी शासनाची योजना आहे. पण सर्व ठिकाणी बचत गटाचे असे शिलाई उद्योग असतीलच असे नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळणे अवघड होणार आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कापड देऊन त्यांच्या खात्यावर पैसे टाकणार असे शिक्षकांनी सांगितले आहे. विद्यार्थ्यांना गणवेशासाठी चांगले कापड मिळणार पण शिलाई साठी चांगला टेलर कुठून आणणार? हा आता प्रश्न उपस्थित झाला आहे.
विद्यार्थ्यांना प्रति दोन गणवेश शिलाईसाठी 110 रुपये मिळणार आहेत. शासनस्तरावरील शिक्षण सूचनेनुसार सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक तालुका स्तरावर गणवेश शिलाईचे नियोजन करण्यात येणार आहे.
संजय जावीर
उपशिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग