उपअभियंता सुनील कटकधोंड ठरले लकी, मिळाला पुन्हा ‘तो”च पदभार

सोलापूर : जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील उप अभियंता सुनील कटकधोंड हे पुन्हा लकी ठरले आहेत. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पुन्हा त्यांना पदभार देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता सुनील कटकधोंड यांना यापूर्वी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला होता. जलजीवन मिशनचे काम मिशन मोडवर असताना तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक कोळी यांच्यावर निविदा प्रकरणात ठपका ठेवण्यात आला होता. त्यावरून त्यांची बदली झाली. त्यामुळे त्यांचा पदभार कटकधोंड यांच्याकडे आला होता. जलजीवन मिशनच्या निविदा घोटाळ्याच्या चौकशीत कटकधोंड यांचे नाव आल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी त्यांना या पदावरून तूर्त बाजूला केले होते. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून कार्यकारी अभियंता पाटील व त्यानंतर गाडेकर यांची या पदावर नियुक्ती झाली होती. पाटील यांनी पदभार सोडल्यानंतर गाडेकर आले. गाडेकर यांनी ही महिनाभराच्या कामकाजानंतर पदभार सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या पदाचा पदभार कोणाकडे द्यावयाचा असा प्रश्न उभा राहिला. कटकधोंड यांना पदावरून बाजूला केल्यानंतर त्यावेळी कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली होती. कटकधोंड यांनी आत्तापर्यंत ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या व्यवस्थितपणे पार पाडल्या आहेत. त्यांना पदावरून दूर केल्यानंतर बरीच हळहळ व्यक्त होत होती. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पुन्हा त्यांना या पदावर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कटकधोंड लकी ठरले आहेत.