सीईओ कुलदीप जंगम यांनी सुट्टीदिवशी दिले सरप्राईज
वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली अचानक भेट

सोलापूर : जिल्हा परिषदेचे नूतन सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या कर्तुत्वाची छाप पाडण्यास सुरुवात केली आहे. शनिवारी सुट्टी असतानाही त्यांनी अचानकपणे वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली आहे.
तत्कालीन सीईओ मनीषा आव्हाळे यांची पुण्याला बदली झाली. शुक्रवारी आव्हाळे यांनी नूतन सीईओ कुलदीप जंगम यांना पदभार दिला. त्यानंतर सीईओ जंगम यांनी विभाग प्रमुखांची भेट घेऊन विविध कामाचा आढावा घेतला. त्यानंतर दुपारी स्वागत व निरोप समारंभ कार्यक्रमास हजेरी लावली. झेडपीची शिस्त व विविध अभियान कायम राखणार असल्याचे त्यांनी पदभार घेताना स्पष्ट केले आहे.
शनिवारी सुट्टीचा दिवस असतानाही त्यांनी आपले कामकाज सुरूच ठेवले. वळसंग प्राथमिक आरोग्य केंद्राला त्यांनी अचानकपणे भेट दिली. आरोग्य केंद्राच्या परिसराचीही त्यांनी पाहणी केली. प्राथमिक आरोग्य केंद्राचे कामकाज नियमितपणे चाललेले पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. हजेरीपटावरील सर्व डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. नूतन सीईओ ने अचानकपणे प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.
कामकाजावर लक्ष केंद्रित…
नूतन सीईओ जंगम यांनी झेडपीच्या कामकाजावर लगेच लक्ष केंद्रित केले आहे. आरोग्य व शिक्षण या महत्त्वाच्या विभागावर त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. वळसंगनंतर सीईओ जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील चपळगाववाडीतील अंगणवाडी व दहिटणेवाडी येथील झेडपी शाळेला अचानकपणे भेट देऊन पाहणी केली.