
सोलापूर : वाढत्या तापमानामुळे मतदान केंद्रावर रांगा लागल्यावर मतदारांचे उन्हापासून संरक्षण होण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रासमोर मंडप उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर इतर सुविधांचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.
सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्रावरील सुविधांसाठी नोडल अधिकारी नेमण्यात आले आहेत. त्यामध्ये मतदान केंद्रावरील प्राथमिक सोयी सुविधांसाठी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर व ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. या दोघांनी दोन्ही मतदारसंघातील 3 हजार 617 मतदान केंद्रावरील सोयी-सुविधांचा आढावा घेतला आहे. यातील 276 मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रॅम्प नसल्याचे दिसून आले आहे. संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, बांधकाम विभागाचे उपअभियंता, ग्रामसेवक यांच्याशी पाठपुरावा करून 109 मतदान केंद्रावर नव्याने रॅम्प तयार केले आहेत. इतर केंद्रावर ही सुविधा करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. 165 केंद्रावर विजेची सोय नव्हती, त्यातील 77 ठिकाणी तात्काळ ही सोय करण्यात आली आहे. 131 केंद्रावर टॉयलेट नसल्याचे दिसून आले होते त्यात 42 टॉयलेट नव्याने बांधण्यात आले आहेत. पंढरपूर व करमाळा तालुक्यातील कामाचा आढावा घेण्यात येत आहे.
जिल्ह्यात गेले दोन दिवस ढगाळी हवामान असले तरी यापूर्वी तापमान 43 अंशावर गेले होते. मतदानाच्या दिवशीही ही स्थिती असेल असे गृहीत धरून मतदारांसाठी पिण्याचे पाणी सावलीसाठी मंडप, मतदारासोबत येणाऱ्या लहान मुलांसाठी कक्ष, लहान बाळ असणाऱ्या महिलांसाठी हिरकणी कक्ष आदी सुविधा देण्यात येणार आहेत. या सुविधा तयार करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे नोडल अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी सांगितले.
निवडणूक खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेत विशेष कक्ष उघडण्यात आला आहे या कक्षाची प्रमुख जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे यांच्यावर देण्यात आली आहे. महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांच्याकडे दिव्यांगाची मतदान व्यवस्था ही जबाबदारी आहे.