काय म्हणता… सुंदर शाळेला मिळणार 51 लाखाचे बक्षीस
'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा" अभियानाला झाली सुरुवात

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान 1 जानेवारी ते 15 फेब्रुवारी 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियानात राज्यस्तरावर प्रथम आलेल्या शाळेला 51 लाखाचे बक्षीस दिले जाणार आहे.
. या स्पर्धेबाबत शासनाने जारी केलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे की शैक्षणिक गुणवत्ता अध्ययन अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धन सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता, चांगल्या आरोग्य सवयी व राष्ट्रीय एकात्मता या घटकांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी शाळांनी आपापसात स्पर्धा करणे हा सर्वोत्तम उपाय असून ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” या संख्यात्मक व गुणात्मक विकास साधणाऱ्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाच्या शाळांमध्ये शिकण्याची संधी मिळू शकते.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत प्रत्येक शाळेचे एकूण शंभर गुणांचे मूल्यांकन होणार असून या मूल्यांकनात राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेल्या शाळेस तब्बल 51 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.
या अभियानात सहभागी शाळांचे कामगिरीच्या आधारे मूल्यांकन होणार आहे. मूल्यांकनाची एकूण दोन प्रपत्र आहेत. त्यापैकी प्रपत्र अ मधील सहा उपघटक असून त्यास एकूण 60 गुण आहेत. तसेच प्रपत्र ब मध्ये शाळा व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील घटकांचा सहभाग हा घटक असून यातील पाच उपघटकांना एकूण 40 गुण आहेत अशा प्रकारे मूल्यांकन होऊन प्रत्येक शाळेत शंभर पैकी गुण मिळणार आहेत.
या अभियानासाठी तालुकास्तरावर जिल्हास्तरावर विभाग स्तरावर व शेवटी राज्य स्तरावर मूल्यांकन होणार आहे.हे मूल्यांकन करण्यासाठी प्राथमिकस्तर ,तालुकास्तर ,जिल्हास्तर ,विभाग स्तर. आयूक्तस्तर समित्या नेमण्यात आलेल्या आहेत .
‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान कार्यवाही करीता ठळक मुददे:
शासन निर्णय/परिपत्रके /मार्गदर्शक सूचना/ युजर मॅन्युअल सर्व क्षेत्रीय पर्यवेक्षीय व संनियंत्रण अधिकारी यांनी प्राप्त करून घेणे व त्याचे वाचन करणे. (शासन निर्णय/परिपत्रके, युजर मॅन्युअल इत्यादी) सर्व पर्यवेक्षीय अधिका-यांनी दररोज किमान दोन शाळांना भेट देऊन अभियानाबाबत खातरजमा करणे, अभियान यशस्वी होण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे.
प्रत्येक कार्यालय प्रमुखाने आपल्या कार्यालयात या अभियानाचा ठळक फलक परिसरात लावणे व सदर अभियानास व्यापक प्रसिद्धी देणे. सर्व परिपत्रके व शासन निर्णय केंद्रप्रमुख युआरसी/सीआरसी यांच्यापर्यंत पोहोचविणे. अभियानाचे शासन निर्णय व सर्व परिपत्रके केंद्रप्रमुख युआरसी/सीआरसी यांच्यामार्फत प्रत्येक शाळा मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्यापर्यंत पोहोचवणे. प्रत्येक शाळेत शाळा प्रमुखांनी सर्व शिक्षक ग्रामस्थ पालक यांना याबाबत अवगत करण्यासाठी प्रत्यक्ष बैठका घेणे. स्थानिक लोकप्रतिनिधी/माजी विदयार्थी/विविध क्षेत्रंतील कलावंत यांच्या शाळांना भेटी आयोजित करणे.शाळेमध्ये केलेल्या विविध उपक्रमांचे क्षणचित्रे/प्रतिक्रिया/मजकूर शाळा प्रणालीच्या संकेतस्थळावर अभियानात सहभाग घेण्यासाठी कार्यवाही करावी.
केंद्र स्तर/तालुका स्तर, जिल्हास्तर वरील मूल्यांकन करणे (प्रत्येक स्तरावर समितीने शाळा भेट दयावी). प्रत्येक स्तरावरील समिती सदस्य-सचिव यांनी पारितोषिक निवड व वितरण कार्यक्रमांचे म.न.पा.स्तर/तालुका स्तर ते राज्य स्तर अनुषंगिक तयारी करणे. या कार्यक्रमामध्ये कविता वाचन, स्वच्छतेचे महत्व, प्रत्येक शाळेत परसबाग विकसित करणे इ. बाबींवर भर दयावा. तसेच भारताच्या उज्ज्वल भविष्यात असणा-या विदयाथ्यांचे अनन्य साधारण महत्व व त्यांच्या योगदानाची आवश्यकता तसेच राज्य शासनाव्दारे या अनुषंगाने जे विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत, त्या विषयी
थोडकयात विदयार्थ्यांना माहिती करुन देणे. या उपक्रमांची तालुकास्तरीय जिल्हास्तरीय व विभागीय स्तरावरील स्पर्धा पूर्ण करणे.
या उपक्रमामध्ये माजी विदयाथ्यांना सहभागी करुन घेणे.सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यातील शाळांमध्ये आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करणे. मुख्यमंत्री यांचे संदेशपत्र प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविणे. सदर पत्र मुलांनी दिनांक १५ जानेवारी ते दि. ०५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान पालकांना वाचून दाखविणे व सदर पत्रासह पालकांसमवेत (आई वडील, भाऊ बहीण/आजी/आजोबा/पालक) यांच्या समवेत सेल्फी काढणे, ब्रीदवाक्य तयार करणे, थोडक्यात शिक्षणविषयक आपले मत तयार करणे. या तिन्ही बाबी या संकेतस्थळावर अपलोड करण्यासाठी दि. १५ जानेवारीला देण्यात येणाऱ्या संकेतस्थळावर आपल्या अभियानासाठी सुरुवात करणे.
अभियानाचा सांगता समारोप फेब्रुवारीच्या तिसऱ्या किंवा चौथ्या आठवडयात आयोजित करण्यात येणार आहे. वरील सर्व बाबीची अंमलबजावणी आपापल्या स्तरावर काटेकोर व व्यवस्थित होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावेत. याबाबत कार्यवाही करताना कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही याची दक्षता सर्वांनी घ्यावी.
‘राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमांच्या शाळांमधील शिक्षक पालक विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी व त्यायोगे स्पर्धात्मक वातावरणातून विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी आनंददायी व प्रेरणादायी वातावरण मिळावे यासाठी महाराष्ट्र सरकारने ही स्पर्धा आयोजित केली आहे या जिल्ह्यातील सर्व शाळांनी सहभाग घ्यावा”.
तृप्ती अंधारे,
शिक्षणाधिकारी (माध्यमिक
जिल्हा परिषद सोलापूर