जलजीवनची कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा होणार कारवाई
झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांचा ठेकेदारांना इशारा

सोलापूर : जलजीवनची कामे वेळेत पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोमवारी ठेकेदारांना दिला.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सोमवारी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व जलजीवनची कामे घेतलेल्या ठेकेदारांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे संचालक अमोल जाधव, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जलजीवन मिशनचे लेखाधिकारी मिरगळे, पीएमसीचे सय्यद, उपअभियंता सुनील कटकधोंड, ठेकेदार संघटनेचे राठोड, तोडकर, तनपुरे यांच्यासह पदाधिकारी आणि तालुक्याचे उपअभियंता उपस्थित होते. प्रारंभी कार्यकारी अभियंता धनशेट्टी यांनी जलजीवनच्या कामाची वस्तुस्थिती मांडली. महिन्यापूर्वी 665 पैकी 180 कामे पूर्ण झाली होती ती आता अडीशेवर गेली आहेत. सप्टेंबर अखेर आणखी अडीचशे कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. ठेकेदारांनी यापूर्वी टेंडर प्रक्रियेत चौकशी लागलेल्या 189 कामांची वर्क ऑर्डर व कामे झालेली बिले द्यावीत अशी मागणी केली. तसेच बरीच कामे पूर्णत्वावर येत आहेत. या कामांची बिले वितरित करण्यासाठी निधीची मागणी करण्यात यावी अशी सूचना मांडली.
सीईओ आव्हाळे यांनी त्या 189 कामांचा विषय शासनाकडे पाठविल्याचे सांगितले. मुदत वाढीचे प्रस्ताव वेळेत द्या अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. जागा व इतर सुविधा उपलब्ध करूनही ज्यांनी कामास विलंब लावला आहे त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा दिला.