घरकुल किती दिवसात बांधावे? सीईओ कुलदीप जंगम यांनी दिला हा सल्ला

सोलापूर : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत मंजुर करण्यात आलेली घरकुले पुढील 100 दिवसात पुर्ण करावीत,असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.
शनिवार दि.२२ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी एका क्लिकवर सोलापूर जिल्ह्यातील 62 हजार 900 घरकुल मंजुरीचे पत्र व अनुदान वाटप कार्यक्रम नियोजन भवन सोलापूर येथे पार पडले. यावेळी बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम म्हणाले की महाराष्ट्र शासनाने 100 दिवसीय कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये घरकुले पूर्ण करणे, हा शासनाचा महत्वकांक्षी विषय आहे. तरी सर्व लाभार्थी यांनी लवकरात लवकर घरकुलाचे बांधकाम पुर्ण करावे व त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना व स्वच्छ भारत मिशन योजनेतील अनुदानाचा अतिरिक्त फायदाही सर्व लाभार्थी यांनी घ्यावा, असे आवाहनही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील पाच तालुक्यातील लाभार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते, त्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी प्रकल्प संचालक डॉ.सुधीर ठोंबरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, महाराष्ट्र राज्यात 20 लाख घरकुलाचे मंजूरी आदेश व 10 लाख लाभार्थी यांनी अनुदान अदा करण्यात येत आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यात 62 हजार 900 घरांना मंजूरी आदेश व 43 हजार 800 लाभार्थी यांना पहिला हप्ता अनुदान वितरण केलेले आहे. तसेच दिलेले उदिष्ट वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व लाभार्थी यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही प्रकल्प संचालक डॉ सुधीर ठोंबरे यांनी केले..
यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी रतिलाल साळुंखे, जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे,कार्यालयीन अधीक्षक सीमा लोखंडे, विस्तार अधिकारी प्रनोती सराफ, लेखाधिकारी सूर्यकांत तोडकरी, जिल्हा व्यवस्थापक दयानंद सरवळे, मीनाक्षी मडवळी, वरिष्ठ सहाय्यक कल्याणी, सर्फराज शेख, प्रमिला बचुटे, पंकजा जवळेकर, इस्माईल मुलाणी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार प्रदर्शन रतीलाल साळुंखे यांनी केले.
ग्रामविकास व पंचायत राज विभागाचा राज्यस्तरीय कार्यक्रम बालेवाडी पुणे येथे पार पडला. राज्यातील 20 लाख घरकुलाचे मंजूरी पत्र व 10 लाख लाभार्थी यांना पहिल्या हप्त्याचे वाटप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित होते.