आदर्श ग्रामसेवक जोडमोटे यांचा पदभार काढण्याची मागणी
नियुक्ती होऊनही ग्रामविकास अधिकारी पुजारी यांना ठेवले प्रतीक्षेत

सोलापूर : एखादे मोठे यश मिळाले तर माणूस हुरळून जातो, त्याचे पाय जमिनीवर राहत नाहीत असे सातत्याने सांगितले जाते. समाजात अशी बरीच उदाहरणे पाहायलाही मिळतात. असाच किस्सा दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायतीच्याबाबतीत घडला आहे. जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने नुकतेच आदर्श ग्रामसेवक म्हणून गौरविलेल्या ग्रामसेवक नागेश जोडमोटे यांचा पदभार तात्काळ काढा अशी मागणी मंद्रूपच्या नागरिकांनी केली आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप ग्रामपंचायत ही बाजारपेठेची मोठी ग्रामपंचायत आहे. मंद्रूपला नगर परिषद करण्याची मागणी होत आहे. असे असताना गेल्या सहा वर्षापासून नागेश जोडमोटे हे येथे ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहेत. स्थानिक म्हणून त्यांनी गावच्या विकासासाठी अनेक योजना राबविण्याचा प्रयत्न केला. गतवर्षी माझी वसुंधरा उपक्रमात त्यांनी ग्रामपंचायतीला राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळवून दिले. त्यामुळे त्यांचे जिल्हा परिषदेत नाव झाले. यानंतर मात्र त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाहीत. ग्रामपंचायत कार्यालयात हजर न राहणे, लोकांची कामे प्रलंबित ठेवणे असे अनेक आरोप त्यांच्यावर सुरू झाले. त्यामुळे सहाजिकच गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रारीचा गठ्ठा साठला आहे. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे ग्रामसेवक जोडमोटे यांची निम्बर्गीला बदली करण्यात आली. पण त्यांच्याकडे मंद्रूपचा पदभार ठेवण्यात आला. एक कोटीच्या निधीवर डोळा ठेवून ग्रामसेवक जोडमोटे काम करीत आहेत असा आरोप नागरिकांतून झाला. त्यानंतर ते वादग्रस्त ठरत गेले. वास्तविक मंद्रूप सारख्या मोठ्या ग्रामपंचायतला आता ग्रामसेवक ऐवजी ग्रामविकास अधिकारी हवा आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष रेवणसिद्ध मेंडगुदले यांनी गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांच्याकडे तक्रार केली वाघ यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत ग्रामविकास अधिकारी एस. एस. पुजारी यांची ग्रामपंचायतीला नियुक्ती केली. पुजारी पदभार घेण्यासाठी गेल्यावर जोडमोटे कार्यशाळेसाठी कोकणात गेल्याचे सांगण्यात आले. कार्यशाळेवरून ते परतले ते थेट जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात जाऊन बसले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशादीन शेळकंदे यांनी मार्च अखेर असल्याने जोडमोटे यांच्याकडे तुर्त पदभार ठेवण्यात यावा अशी सूचना केल्यामुळे पुन्हा त्यांना अभय मिळाले आहे.
पुजारी यांना काम काय?
मंद्रूप ग्रामपंचायतसाठी नियुक्ती मिळालेले पुजारी सध्या दक्षिण सोलापूर पंचायत समितीत ठाण मांडून बसले आहेत. त्यांना काहीच काम नसल्याने बसून पगार द्यावा लागत आहे तर इकडे जोडमोटे दोन ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळत आहेत. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागली तर पुन्हा जोडमोटे यांचा दोन महिने मुक्काम वाढणार अशी स्थिती आहे. ग्रामपंचायत कार्यालयात ते केव्हा भेटतील हे कोणालाच निश्चित सांगता येत नाही. बऱ्याच वेळा त्यांचा भ्रमणध्वनी बंद असतो तर ते कॉल स्वीकारतच नाहीत. सकाळी कार्यालयात हजेरी लावणे त्यानंतर झेडपीला काम आहे असे सांगून निघून जाणे असा त्यांचा नित्यक्रम असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे त्यांच्यावर वरदहस्त नेमका आहे तरी कोणाचा? असा सवाल उपस्थित होत आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभर घेतल्यानंतर गडबड करणाऱ्यांची माझ्याशी गाठ आहे असे जाहीर केले होते पण शिक्षणाधिकाऱ्यांनी आदेश काढून तीन महिने लोटले तरी प्रभारी केंद्रप्रमुखांनी आपला पदभार सोडला नाही तर ग्रामसेवक जोडमोोटे यांच्या बदलीबाबत चालढकल केली जात असल्याचे दिसून आले आहे.
तक्रारी आहेत: वाघ
ग्रामसेवक जोडमोटे यांच्याविरुद्ध गंभीर तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे त्यांचा पदभार काढण्यात आला होता. ग्रामविकास अधिकारी पुजारी यांची तेथे नियुक्ती करण्यात आली आहे. वरिष्ठांच्या सूचनेनुसार मार्चअखेरपर्यंत त्यांना कामकाज करा असे सांगण्यात आल्याचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी सांगितले.