
सोलापूर : लोकांची ऑनलाईन होणारी फसवणूक टाळण्यासाठी केंद्र शासन व आरबीआयने विविध माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जनजागृती सुरू केलेली असतानाही ऑनलाइन भामट्यांच्या युक्त्यांना सर्वसामान्य बळी पडत असताना दिसून येत आहेत. राज्यस्थानची प्रसिद्ध म्हैस स्वस्तात पाठवून देतो म्हणून एका ऑनलाइन भामट्याने मंद्रूपच्या तरुण शेतकऱ्याला ५१ हजाराला गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
मंद्रूप येथील घाटे नामक एक तरुण शेतकरी 31 डिसेंबर रोजी आपल्या स्मार्ट फोनवर यूट्यूबवरील व्हिडिओ पाहत असताना त्याला राजस्थानमधील एका फार्म हाऊसमधील जातिवंत म्हशी स्वस्तात विकण्यात येत असल्याचा व्हिडिओ पाहायला मिळाला. या व्हिडिओत देण्यात आलेल्या नंबरवर त्या शेतकऱ्याने संपर्क साधल्यावर संबंधित भामट्याने त्याला आपले डेअरी फार्म नोंदणीकृत असून आपल्याकडे संस्थेचे ओळखपत्र असल्याचेही फोटो पाठवले. यावर त्या शेतकऱ्याने विश्वास ठेवल्यावर ऑनलाइन पंधरा हजार रुपये पाठवल्यास 51 हजारात म्हैस टेम्पोने पाठवण्यात येईल असे सांगितले. त्या भामट्याने म्हशीचे फोटोही दाखवले. त्यावर त्या तरुण शेतकऱ्याचा विश्वास बसला व स्वस्तात चांगली जातिवंत म्हैस मिळत आहे म्हणून पंधरा हजार रुपये पाठवल्यावर संबंधित भामट्याने टेम्पो नंबरसह बोगस पावती पाठवली. या टेम्पोने म्हैस पाठवण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर पुन्हा वारंवार त्या शेतकऱ्यास संपर्क साधून टेम्पो या ठिकाणी आला आहे, अशी माहिती देत पुन्हा बॉर्डरवर टेम्पो आडवला आहे, तेथे पैसे द्यावे लागतात अशी थाप मारून पुन्हा उरलेले पैसे काढून घेतले. पैसे देऊनही चार दिवसात टेम्पो आला नाही म्हणून त्या शेतकऱ्याने वारंवार त्या क्रमांकावर संपर्क साधला. प्रवासात अडचणी येत आहेत अशा थापा मारून त्या भामट्याने पुन्हा पैशाची मागणी सुरू केल्यावर त्या शेतकऱ्याला काहीतरी गडबड होत असल्याचा संशय आला. चार दिवसांनी त्याने त्या भामट्याने ऑनलाइन पाठविलेला डेअरी फार्मचा परवाना व त्याच्या ओळखपत्राचे प्रिंट काढून मंद्रूप पोलीस ठाणे गाठले. ही सर्व कागदपत्रे बोगस आहेत, तुझी ऑनलाईन फसवणूक झाली आहे असे सांगताच त्या शेतकऱ्याने डोक्याला हात लावला. त्यावर मंद्रूप पोलिसांनी त्या शेतकऱ्याला याबाबत दाद मागण्यासाठी ग्रामीण पोलिसांच्या सायबर शाखेकडे जाण्याचा सल्ला दिला. ग्रामीण पोलीस सायबर शाखेशी त्या शेतकऱ्याने संपर्क साधल्यानंतर तेथील पोलिसांनी त्या शेतकऱ्याला ऑनलाइन तक्रार करण्यामध्ये मदत केली. मंद्रूपमध्ये एका व्यापाऱ्याला अशाचप्रकारे गंडा घातल्याचे सांगण्यात येत आहे.
फोन कॉल, व्हाट्सअप मेसेजवरून स्वस्तात वस्तू मिळतात व इतर बहाणे सांगून लोकांना गंडविण्यात सायबर चोर सराईत झाले आहेत. राज्यातील असे फोन कॉल किंवा व्हिडिओवरील माहितीची खातरजमा न करता व ॲडव्हान्स ऑनलाइन पेमेंट न देता कोणत्याही गोष्टी खरेदी करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे.