मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात कोठेही बंद नाही
विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी अडचण होऊ देऊ नका

- सोलापूर: सोमवारपासून समाज माध्यमांवर ‘महाराष्ट्र बंद ‘ अश्या पोस्ट फिरत असून वास्तविक पाहता ह्या पोस्ट उस्फूर्तपणे कांहीं मराठा आंदोलक फिरवत आहे. परंतु महाराष्ट्रभर जे मराठा आरक्षण आंदोलने चालू आहेत, ती सर्व मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने शांततापूर्ण मार्गाने चालू आहेत. सध्या फक्त जरांगे पाटील हेच मराठा समाजाचे नेते आहेत. जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र बंद अशी कोणतीही हाक दिली नाही, असे स्पष्टीकरण सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांनी दिले आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाची चळवळ राज्यभर तीव्र झाली आहे सोलापूर जिल्ह्यातील या आंदोलनाचे मोठ्या प्रमाणावर पडसाद उमटले आहेत. पण सध्या शाळा महाविद्यालयात सहामाहीच्या परीक्षा चालू आहेत. कांहीं पालक , शाळा आणि शिक्षक द्विधा मनस्थितीत आहेत . कांहींना परगावी जायचे आहे. सकल मराठा समाज सोलापूर शहर जिल्हातर्फे असे अधिकृतपणे जाहीर करतो की सकल मराठा समाजाच्यावतीने असा कोणताही बंद घोषित केलेला नाही. शांतता मार्गाने आरक्षणासाठीचे आंदोलन असेच चालू ठेवूया असे आवाहन माऊली पवार, प्रा. गणेश देशमुख ,राजन जाधव, विनोद भोसले यांनी केले आहे.
दरम्यान मराठा आरक्षण आंदोलनाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. सोमवारी रात्री मोहोळ तालुक्यातील अंकोली येथे राज्य परिवहन मंडळा एका बसला पेटवण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे महामंडळाने जिल्ह्यातील सर्व मुक्कामी गाड्या परत बोलावल्या आहेत. त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यात एका युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारीही जिल्ह्यातील महामार्गावर आंदोलने सुरूच आहेत. तसेच सोलापुरातील आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटला कुलूप ठोकले आहे.