झेडपीचे सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या कार्यपद्धतीवर कर्मचारी झाले खूष
नव्या वर्षापासून कर्मचाऱ्यांना मिळणार प्रशिक्षणाची संधी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या कार्यपद्धतीवर कर्मचारी खुश झाले आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणाची संधी मिळणार आहे.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी यापूर्वीच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या प्रशासन विभागाने नियोजन करून एक जानेवारीपासून पंढरपुरात सुरू करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणासाठी पहिली बॅच तयार ठेवली आहे. प्रशिक्षण आणि कर्मचाऱ्यांच्या ज्ञानाची परीक्षा असे सीईओ आव्हाळे नियोजन केले होते. पण परीक्षेची कर्मचाऱ्यांना भीती वाटल्यावर त्यांनी तात्काळ बैठक घेऊन प्रशिक्षण देण्याचा हेतू स्पष्ट केला. जिल्हा परिषद सेवेतील कर्मचा-यांना प्रशिक्षणाद्वारे त्यांचे कौशल्य वाढून त्यांच्या दृष्टीकोनात बदल करणे, जिल्हा परिषद, पंचायत समिती व इतर क्षेत्रीय कार्यालयातील विभागाची रचना आणि कार्यपद्धती लोकाभिमुख करण्याचा दृष्टिकोन असल्याचे सांगितले. प्रशिक्षणाने कर्मचा-यांची क्षमता बांधणी केली जाते. प्रशिक्षण आणि क्षमता बांधणी ही निरंतरपणे चालणारी प्रक्रिया असून विकासात्मक प्रशासन आणि लोकाभिमुख, लोकविकासाचे कार्य प्रशासनाकडून होणे अपेक्षित असते. शासनाची विविध धोरणे, कायदे, शासन निर्णय, परिपत्रके, योजना याबाबत पद्धतशीर कार्यक्रम आखून त्याची अंमलबजावणी क्षेत्रीय यंत्रणेमार्फत करणे आवश्यक आहे. त्यासाठी कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कार्यरत असणारी आणि सर्वदूर पसरलेली प्रशासकीय यंत्रणेची प्रशिक्षण माध्यमातून क्षमता बांधणी करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामुळे प्रशिक्षार्थीच्या ज्ञान, कौशल्य, दृष्टिकोन आणि वर्तन यात बदल करुन प्रशासनात अमुलाबदल घडविणे, प्रशिक्षण धोरणाचा मुख्य उददेश असल्याचे पटवून सांगितल्यावर कर्मचारी खुष झाले आहेत.
नवीन वर्षापासून सुरू करण्यात येणाऱ्या या उपक्रमाच्या पहिल्या बॅचचे वेळापत्रक प्रशासनाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी जाहीर केले आहे. पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात अजितकुमार देशपांडे यांचे मार्गदर्शन होणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या प्रशिक्षणात प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी सांगितले. विशेष म्हणजे प्रशिक्षणानंतर कोणतीही परीक्षा नसल्याने कर्मचारी खुष झाले आहेत. पहिल्यांदा हा उपक्रम जाहीर केल्यावर सीईओ आव्हाळे यांनी परीक्षा घेणार असे म्हटले होते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी धास्ती घेतली होती पण आता प्रशिक्षणाच्या आदेशात परीक्षेचा उल्लेख नसल्यामुळे कर्मचारी खूष झाले आहेत.