अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी आरबळे यांचा नवा कांड

सोलापूर : पुणे विभागीय आयुक्तांच्या अधिकाराचा गैरवापर करत अक्कलकोट तालुक्यात 21 प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या करत वादग्रस्त ठरलेले प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांचे दिवसेंदिवस नवीन कारनामे समोर येत आहेत.अश्यातच चौकशीच्या फेऱ्यातून वाचण्यासाठी गटविकासाधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय 21 पैकी 12 प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य प्रतिनियुक्त्या रद्द करून केलेल्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रकार चौकशी समितीच्या सुनावणीदरम्यान उघडकीस आल्याची माहिती मागासवर्गीय संघटनेचे अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी दिली.
2022-23 च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रक्रिया पूर्ण झालेली असतानाही 2023-24 ची संच मान्यता अंतिम न होताच नियमबाह्य पद्धतीने समायोजनाच्या नावाखाली 21 प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या अक्कलकोटचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे यांनी केल्या होत्या.याविरोधात मागासवर्गीय संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केलेली होती.या तक्रारीची गंभीर दखल घेत सीईओ जंगम यांनी नियमबाह्य बदल्यांच्या चौकशीसाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती शिक्षणाधिकारी योजना सुलभा वठारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे.
चौकशी समितीच्या सुनावणी दरम्यान 12 प्राथमिक शिक्षकांच्या प्रतिनियुक्त्या गटविकासाधिकारी यांच्या मान्यतेशिवाय रद्द केल्याचा मुद्दा उपस्थित करून हा प्रकार गंभीर असल्याचे चौकशी समितीच्या निदर्शनास आणून दिले होते.केलेल्या चुका झाकण्यासाठी सातत्याने वादग्रस्त प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रशांत आरबाळे नव्या शक्कला लढवत असून ग्रामपंचायत कार्यालय,शाळा व्यवस्थापन समिती यांच्याकडून लेखी घेण्यासाठी धावपळ करत असल्याची माहिती अध्यक्ष महांतेश्वर कट्टीमनी यांनी दिली.