गौरवास्पद! झेडपीच्या तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना एनएबीएच मानांकन प्रमाणपत्र
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केले आरोग्य विभागाच्या टीमचे अभिनंदन

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे तीन आयुर्वेदिक दवाखान्यांना एन ए बी एच प्रमाणपत्र प्राप्त झाल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आरोग्य विभागाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
आरोग्य विभागाअंतर्गत प्रा.आ.केंद्र, आयुर्वेद दवाखाने व उपकेंद्र अशा एकुण 514 आरोग्य संस्था कार्यरत आहेत. यातील बरेच आरोग्य केंद्र व 4 आयुर्वेद दवाखाने ISO मानांकन प्राप्त आहेत. नुकतेच भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) नवी दिल्ली यांचेकडून सोलापूर जिल्ह्यातील 3 शासकीय आयुर्वेद दवाखाने यांना आरोग्य गुणवत्ता प्रतिष्ठित असे NABH मानांकन प्रमाणपत्र मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांना प्राप्त झाले आहे. यामध्ये शासकीय आयुर्वेद दवाखाना जिंती (ता. करमाळा), शासकीय आयुर्वेद दवाखाना शेळवे (ता. पंढरपूर), श्रीपिंपरी (ता. बार्शी) या आयुर्वेदिक दवाखान्याचा समावेश आहे.
या आयुर्वेद दवाखान्यांमध्ये आयुर्वेद व ‘योग” ची गुणवत्तापूर्ण सेवा रुग्णांना दिली जाते. मोफत आयुर्वेद औषध उपचारबरोबर विद्धकर्म,अग्निकर्म, नस्य, नाडी स्नेहन-स्वेदन,मसाज, कपिंग अशा विविध सुविधा दिल्या जात आहेत. तसेच दररोज सकाळी तज्ञ योग प्रशिक्षकामार्फत योग सत्राचे आयोजन केले जात आहे.
नॅशनल असेसमेंट अँड अक्रेडीशन कौन्सिल ही भारतीय संस्थेच्या मान्यतेसाठी जबाबदार असलेल्या दोन प्रमुख संस्थांपैकी राष्ट्रीय मान्यता मंडळ हे एक आहे. या संस्थेमार्फत उच्च प्रशिक्षित मंडळमार्फत तपासणी करून सर्व रुग्णांना सुख सुविधा प्राप्त आहेत का? यांचा अभ्यास करून NABH प्रमाणपत्र बहाल केले जाते. उपरोक्त आयुर्वेद दवाखाने NABH मानांकन प्राप्त करणेकामी मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने यांनी मार्गदर्शन केले. जिल्हा आयुष अधिकारी डॉ विलास सरवदे यांनी आयुर्वेद व योग तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी सतत नियमितपणे या दवाखान्यांना भेटी दिल्या व आवश्यक त्या सुधारणा करून घेतल्या. यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुद्धा दिल्लीच्या सदस्यांसमवेत वैद्यकीय अधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
NABH मानांकन मिळणेसाठी खडतर असा प्रवास तेथील वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या सहभागामुळे शक्य झाला आहे. सदर एनएबीएच मानांकनाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी व सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.