पाहुण्यांसाठी सभासद गेटवर आत सुरू होती सभा
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेत सभासदांच्या प्रश्नांना दिली बगल

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक एक च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ होण्याची कारणे वेगवेगळी सांगितली जात आहेत. सत्कार कार्यक्रमाला निमंत्रित केलेल्या पाहुण्यांसाठी गेटवर सभासद वाट पाहत बसले होते तर अध्यक्षांनी परस्पर कोरम नसताना सभेचे कामकाज सुरू केले होते, असा आरोप अविनाश गोडसे यांनी केला आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक एक ची शनिवारी वार्षिक सर्वसाधारण सभा झाली. या सभेत झालेल्या गोंधळाचे सविस्तर वृत्त ‘सोलापूर समाचार” ने प्रसिद्ध केल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. संस्थेचे संचालक धन्यकुमार राठोड यांनी सभा खेळीमेळीत झाली पण कुणीतरी जाणीवपूर्वक गोंधळाचे व्हिडिओ प्रसारमाध्यमांना दिले असा आरोप केला आहे. पतसंस्थेचे अध्यक्ष विवेक लिंगराज यांनीही दीप प्रज्वलनवेळी काय घडले याबाबत खुलासा केला आहे. चेअरमन लिंगराज यांच्या स्पष्टीकरणानंतर गोडसे यांनीही आपले म्हणणे ‘सोलापूर समाचार” पुढे मांडले आहे. पतसंस्थेच्या सभेला बरेच सभासद आले होते. आम्ही सत्काराच्या कार्यक्रमाला निमंत्रित केलेल्या पाहुण्यांची गेटवर वाट पाहत बसलो होतो. सभागृहात कोरम नसताना चेअरमन लिंगराज यांनी सभेच्या कामकाजास सुरुवात केली होती. हा प्रकार लक्षात आल्यावर आम्ही सभागृहात जाऊन आक्षेप घेतला. विषय पत्रिकेवरील जमाखर्चाबाबत आमचे आक्षेप आहेत. त्याबाबत आम्हाला उत्तरे हवी होती. त्यामुळे आम्ही बाजू मांडत असतानाच प्रमुख पाहुणे आले. त्यावेळी चेअरमन लिंगराज यांनी सभेचे कामकाज गुंडाळून प्रतिमा पूजन करायचे आहे असे जाहीर केले. वास्तविक सभा सुरू होण्याअगोदर दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन होणे आवश्यक होते. त्यामुळे मी याला आक्षेप घेतल्यावर त्यांनी अरे तुरेची भाषा वापरली. सभासद राजेश देशपांडे, अविनाश गोडसे, अरुण क्षीरसागर, दिनेश बनसोडे,सचिन मायनाळ, संजय गौडगाव, राजेंद्र मानवी आदि सभासदांनी सडेतोड प्रश्न विचारून भांडाफोड केला. सचिव देशपांडे निवृत्त झालेले असताना त्यांना मुदतवाढ कोणत्या आधारे देण्यात आली. निवडणुकीवेळी असे धोरणात्मक निर्णय घेता येतात का? याबाबत आम्हाला स्पष्टीकरण हवे आहे. चेअरमन लिंगराज यांच्या मनमानी कारभाराला अनेकजण कंटाळले आहेत. चेअरमनच्या या एकाधिकारीशाहीला कंटाळून व्हा. चेअरमन सुहास चेळेकर, संचालक अनिल जगताप, संतोष नलवडे, सुखदेव भिंगे,श्रीमती एस व्ही यादगिरी, त्रिमुत्री राऊत हे सभेला उपस्थित राहिलेले नाहीत. तरीसुद्धा चेअरमन यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेच्या बातमीपत्रात त्यांची नावे घातली आहेत. त्यामुळे बरेच सभासद या एकाधिकारशाहीला कंटाळले आहेत. सभासदांचा हा रोष आम्ही लोकशाही मार्गाने मांडला आहे, असे स्पष्टीकरण गोडसे यांनी दिले आहे.
जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्था क्रमांक एक ची निवडणूक तोंडावर आहे. अशात वार्षिक सर्वसाधारण सभेत झालेला हा गोंधळ सध्या चर्चेचा विषय झाला आहे.