लाडक्या बहिणींमुळे भावाचे घर पावसात
दुसरा हप्ता मिळत नसल्याने घरकुलांची बांधकामे अडली

राजकुमार सारोळे
विशेष बातमी
सोलापूर : “कावळ्याचं घर शेणाचं, चिमणीचं घर मेणाचं’ पाऊस आल्यावर कावळ्याचं घर वाहून गेलं… ही गोष्ट तुम्ही ऐकली असेल. आता अशीच गोष्ट सांगण्याची वेळ आली आहे आवास योजनेतील घरांची. वरून पावसाचा कहर आणि दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे विविध आवास योजनेतील घरांचे बांधकाम रखडले आहे.
जिल्हा परिषद व नगरपालिका, महापालिकातर्फे हद्दीतील गरिबांसाठी पंतप्रधान व इतर आवास योजनेतून घरकुल मंजूर करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने अंतर्गत जिल्ह्यात जवळपास दहा हजार घरकुलांच्या बांधकामांना मंजुरी देण्यात आली आहे. घरकुल बांधण्यासाठी लाभार्थ्यांना पहिला हप्ताही मंजूर करण्यात आला आहे. यातून लाभार्थ्यांनी स्वतःचे पैसे घालत बांधकाम जवळपास छतापर्यंत आणले आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. आता घरावर पावसापासून संरक्षण करण्यासाठी छत घालण्याच्या विचारात लाभार्थी असतानाच शासनाने दुसरा हप्ता देण्यास ब्रेक लावला आहे. लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणावर निधी वळता केल्यामुळे आवास योजनेतील घरकुलाचा दुसरा हप्ता देण्यास शासनाकडे पैसे नाहीत. त्यामुळे दुसरा हप्ता न मिळाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक घरकुलांची कामे थांबली आहेत. लाभार्थी दुसरा हप्ता मेळावा म्हणून ग्रामपंचायत व पंचायत समितीकडे हेलपाटे मारत आहेत. पण तिजोरीत पैसा नसल्यामुळे निधी आल्यावर पाहू अशी अधिकारी उत्तरे देत आहेत. यापूर्वी घरकुल योजना राबविण्यासाठी शासन आग्रही होते. घरकुलाचा निधी तातडीने वितरित करून लाभार्थ्यांना घरकुल पूर्ण करून घेण्याबाबत मंत्रालयापासून ग्रामपंचायतीपर्यंत अधिकाऱ्यांचा व्हिसीद्वारे ससेमीरा सुरू होता. पण आता निधीच नसल्यामुळे सगळे बंद झाले आहे. दक्षिण सोलापुरात दीड हजार घरकुलाचा दुसरा हप्ता रखडल्याचे गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ यांनी सांगितले.
त्यामुळे आता ऐन पावसाळ्यात घरकुलाची कामे बंद झाल्यामुळे बांधकाम कामगारांची अडचण झाली आहे. अशा स्थितीत घरी तीन हजार आल्याची खुशी त्यांच्यात दिसून येत आहे. पण लाडक्या बहिणीसाठी भावाचे घर मात्र पावसाळ्यात छतावाचून राहिले आहे. त्यामुळे भावाला परतीचा पाऊस आणि दिवाळीतील थंडी सोसावीच लागणार आहे.