डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायाचे फिरवलेले चाक गतिमान करण्याची सर्वांची जबाबदारी
झेडपीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांचे प्रतिपादन

सोलापूर : महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक न्यायासाठी अहोरात्र परिश्रम घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी फिरवलेले हे चाक अधिक गतिमान करण्यासाठी त्यांचे विचार आत्मसात करून वाटचाल करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133 व्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यानिमित्त जिल्हा परिषद समाज कल्याण विभागातर्फे दि. १० एप्रिल ते २५ एप्रिल या कालावधीत जिल्ह्यात समता पंधरवाड्याचे आयोजन करणेत आले आहे.जिल्हा परिषदेचा समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद कास्ट्राईब कर्मचारी संघटना,मराठा सेवा संघाच्यावतीने भीमगीत व व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रारंभी. महामानव डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. याप्रसंगी व्याख्याते डाॅ. रविंद्र चिंचोळकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसाद मिरकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, खराडे, सुनील कटकधोंड, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता पारसे, कास्ट्राईबचे अरूण क्षिषीरसागर, मराठा सेवा संघाचे अविनाश गोडसे, लिपीकवर्गीय संघटनेचे राजेश देशपांडे, कर्मचारी संघटनेचे विवेक लिंगराज, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी मार्गदर्शन करताना सीईओ मनीष आव्हाळे म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यापुढे आपले काम खूप छोटे आहे. बाबासाहेब यांचे वाचन व लेखन खूप होते. त्यामुळे केवळ आजच्या दिवसाची आठवण न ठेवता त्यांचे विचार देखील आत्मसात करा. जिल्हा परिषद ग्रामीण विकासाचे केंद्र आहे. आपणास दिलेले अधिकार शेवटच्या घटकासाठी वापरणे आवश्यक आहे. सर्वसामान्यांचा विकास हाच मंत्र सर्व कर्मचाऱ्याने आत्मसात करून आपले काम सुरू ठेवावे असे सांगत सीईओ आव्हाळे यांनी कवी नामदेव ढसाळ यांचे प्रेरणादायी कविता ऐकवली.
प्रास्तविक समाज कल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी केले. व्याख्याते डाॅ. रविंद्र चिंचोळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक पैलू उलगडले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला जागृत करणेसाठी मुकनायक हे वृत्तपत्र काढले. त्यानंतर त्यांनी बहिष्कृत समाजाचे प्रश्न मांडणेसाठी बहिष्कृत भारत हे वृत्तपत्र काढले. त्यानंतर स्वातंत्र्याचा लढा हा सर्वाना घेऊन लढावे लागेल म्हणून त्यांनी जनता हे वृत्तपत्र काढले. जगातील सर्व राज्य घटनांचा अभ्यास करून भारताची लिखित स्वरूपात राज्यघटना त्यांनी तयार केली. डॉ. बाबासाहेब यांनी संकुचित विचार कधी केला नाही. एकही क्षेत्र असे नाही ज्याचा बाबासाहेब आंबेडकर यांचा संबंध आला नाही. पुरनियंत्रणाच्याबाबतीत पाण्याचे व्यवस्थापन करणेसाठी त्यांनी नदीजोड प्रकल्प मांडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजकल्याण विभागाचे विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड, संदिप खरबस, एच. एम. बांगर, सहाय्यक लेखाधिकारी सावळा काळे यांनी परिश्रम घेतले.
‘स्वानंद”च्या गीतांना प्रतिसाद
स्वानंद म्युझिकल ग्रुपने भीमगीत गायन केले. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर तर्फे सलग दुसऱ्या वर्षी भीमगीत गायन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महेश कोटीवाले व त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘तुझ्या रक्तातील भीम पाहिजे” यासह विविध गीत गायनाने उपस्थित यांची दाद मिळवली. यावेळी कास्ट्राईब संघटनेचेवतीने मिठाईचे वाटप करणेत आले. सुत्रसंचालन विस्तार अधिकारी गुरव यांनी केले. श्रीशैल चिंचोळीकर यांच्या दैनिक प्रबुध्दराज मध्ये प्रसिद्ध केलेल्या जयंती विशेषांकाचे प्रकाशन सीईओ आव्हाळे यांचेहस्ते करणेत आले.