
सोलापूर : अरे वा… मी आणलेल्या रोपातून वडाचे झाड इतके मोठे झाले! हे उद्गार आहेत सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचे. शुक्रवारी त्यांनी जुळे सोलापुरातील सिद्धेश्वर पार्कला भेट दिली. त्यावेळी त्यांनी येथील वृक्ष लागवडीची पाहणी केली.
सोलापुरातील बेकायदा बांधकामाचे पाडकाम आठवले की डोळ्यासमोर उभे राहतात ते महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार. एका खाजगी कार्यक्रमानिमित्त गुरुवारी ते सोलापुरात आले होते. शुक्रवारी सकाळी त्यांनी बॉम्बे पार्क येथील दिव्य मराठीचे पत्रकार चंद्रकांत मिराखोर व सिद्धेश्वर पार्कमधील पत्रकार राजकुमार सारोळे यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या समवेत पत्नी शुभांगी गुडेवार, एस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवसे उपस्थित होते. या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. गुडेवार यांनी पदावर असताना सोलापुरातील उन्हाचा कडाका अनुभवला होता. त्यामुळे सोलापुरातील हिरवळ वाढवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. लहान रोपांची लागवड केल्यावर भटक्या जनावराकडून उपद्रव होतो हे लक्षात आल्यावर त्यांनी राजमुंद्री येथून मोठी रोपे मागवली होती. त्यातील वडाचे रोप पत्रकार राजकुमार सारोळे यांना भेट दिले होते. हे रोप कसे वाढले आहे याची त्यांनी आवर्जून पाहणी केली. वडाचे झाड मोठं झालेलं पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. शहरात अशी मोठी झाडे वाढल्याने तापमानात घट होईल व ऑक्सिजनयुक्त वातावरण राहण्यासाठी मदत होईल, अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली. सिद्धेश्वर पार्कचे सदस्य जी. आय. हावशेट्टी यांनी त्यांचे स्वागत केले.