निधी खर्च करण्यात झेडपीचा प्राथमिक शिक्षण विभाग मागे
सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केल्या महत्वाच्या सूचना

सोलापूर : जिल्हा परिषद सेस व डीपीसीकडून आलेला निधी खर्च करण्यात प्राथमिक शिक्षण विभाग मागे पडला आहे. निधी वेळेवर खर्च करण्याकडे लक्ष देण्याची सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या कामाच्या खर्चाबाबत बुधवारी आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांच्यासह उपशिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेला मोठा निधी येतो. नवीन शाळा खोल्या, धोकादायक शाळांच्या खोल्यांची दुरुस्ती, शौचालय, प्रयोगशाळा बांधणीसाठी मोठा निधी येतो. त्याचबरोबर झेडपी सेस फंडातून शाळांच्या विविध कामासाठी तरतूद केली जाते. निधी खर्चात प्राथमिक शिक्षण विभाग मागे पडल्याने जिल्हा परिषदेचा खर्च 93% इतका झाला आहे. शिक्षण विभागाने वेळेत हा निधी खर्ची घातला असता तर जिल्हा परिषदेचा खर्च 98% पर्यंत गेला असता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी वेळेचे बंधन पाळणे आवश्यक असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आवळे यांनी सांगितले.
शाळा दुरुस्ती व शौचालय व इतर बांधकामासाठी मुख्याध्यापकांकडून गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिले जातात. पण निधी खर्चाच्या वेळेस लोकप्रतिनिधींच्या कामाकडे लक्ष दिले जात असल्याचा तक्रारी आहेत. ज्या शाळेने निधी मागितला त्या शाळांना वेळेवर निधी मिळत नाही तर काही शाळांना दुबार निधी दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. बांधकाम विभागाच्या संबंधित टेबल क्लार्ककडून या कामाचे नियोजन काटेकोर होते का? हे तपासणी गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. समग्र शिक्षण अभियान अंतर्गत बांधकाम कार्यकारी अभियंताचा पदभार अचानक काढण्यात आला. पण पुढे काय झाले याची माहिती स्पष्ट होत नसल्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.