आरोग्यमंत्री सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य कर्मचारी असुरक्षित
जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष नवले यांना निलंबित करण्याची मागणी

सोलापूर : राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच महिला आरोग्य कर्मचारी असुरक्षित असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. झेडपीकडे गेल्या सहा महिन्यात तीन गंभीर तक्रारी आल्या पण त्याकडे विभाग प्रमुखांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लज्जास्पद प्रकार घडल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. याबाबत विभाग प्रमुखांकडे तक्रार करूनही दखल न घेतल्याने मंत्रालयापर्यंत हा प्रकार गेल्याचे सांगण्यात येत आहे. अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य केंद्रात नव्याने नियुक्त झालेल्या महिला कर्मचाऱ्याच्याबाबतीत हा प्रकार घडला आहे. आता जिल्हा आरोग्य विभागातर्फे संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे परंतु पंधरा दिवस जिल्हा आरोग्य विभाग काय करत होता? असा सवाल आता उपस्थित झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या सहा महिन्यात महिला कर्मचाऱ्यांना त्रास झाल्याच्या तीन तक्रारी झेडपीच्या प्रशासनाकडे दाखल झाल्या आहेत. काही दिवसांपूर्वी प्रशिक्षण केंद्रातील प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्याने मोहोळ तालुक्यातील एका महिला आरोग्य कर्मचाऱ्यास अरेरावी केली होती. याबाबत संघटनेने तक्रार करूनही संबंधित कर्मचाऱ्याला अभय दिल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर करमाळा तालुक्यातून असाच प्रकार घडला आहे. आरोग्य संघटनेने याबाबत लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीनंतर संबंधित कर्मचाऱ्यांना त्रास दिला जात असल्याचेही आता उघड झाले आहे. संबंधितावर जरब बसेल अशी कारवाई विभागप्रमुखांकडून वेळीच केली गेली नसल्याने अशा प्रकारात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या जिल्ह्यातच आरोग्य कर्मचाऱ्यांच्याबाबतीत असे प्रकार घडत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
पवार यांचे पत्र कुठे आहे?
आरोग्य उपसंचालक राधाकृष्ण पवार यांनी काही महिन्यापूर्वी एका किरकोळ तक्रारीची दखल घेत सीईओ मनीषा आव्हाळे यांना पत्र दिले होते पण आता त्यांच्याच कर्मचाऱ्याच्याबाबतीत असा गंभीर प्रकार घडला तरी त्यांनी याबाबत सीईओंना पत्र दिले का? असा सवाल आरोग्य कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
वेगळा न्याय नको…
मागील महिन्यात समाज कल्याण अधिकारी सुनील खमितकर यांना निलंबित करण्यात आले आहे लातूर व सोलापुरातील कामकाजाचा ठपका ठेवत सीईओंच्या अहवालावर ही कारवाई झाली आहे. मग आरोग्य विभागात इतके गंभीर प्रकार घडल्यानंतरही जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांच्या बाबतीत वेगळा न्याय का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. डॉ. नवले यांनाही तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी आता कर्मचाऱ्यांमधून मागणी होत आहे.
माझ्यावर पद लादले…
319 कंत्राटी डॉक्टरांना दोन महिन्यापासून पगार नाही. आरोग्य कर्मचाऱ्यांचाही पगार होण्यास विलंब झाला आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान व्यवस्थापक पदाचा पदभार जानगवळी यांच्याकडे देण्यात आला आहे तर कार्यक्रम व्यवस्थापकाचा अतिरिक्त पदभार आयुष्य अधिकारी डॉ. विलास सरवदे यांच्याकडे आहे. डॉक्टरांच्या पगाराबद्दल विचारले असता काम करून घेणे हे माझे काम आहे. पगाराची जबाबदारी आर्थिक विभाग पाहणाऱ्याकडे आहे. वास्तविक मी गॅझेटेड ऑफिसर आहे. कंत्राटी पद माझ्यावर लादले आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. सरवदे यांनी दिली आहे. आरोग्य विभागातील या गोंधळाची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.