माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
शाळा आणि आरोग्य केंद्रांच्या बांधकामाला देणार प्राधान्य

सोलापूर : माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांच्याकडे सादर केला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी दिली.
टप्पा अनुदानावर आलेल्या माध्यमिक शाळांची अनेक प्रकरणे रखडलेली असताना माध्यमिक शिक्षणाधिकारी मारुती फडके यांनी दीर्घ रजा मागितली. पहिल्यांदा रजेला नकार दिल्यावर ते कामावर हजर झाले पण त्यांनी रजिस्टर गहाळ प्रकरणाबाबत गांभीर्याने घेतले नाही. त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेले. त्यांना टप्पा अनुदानाची प्रकरणे निकालात काढण्याबाबत सूचना केल्यावर पुन्हा कामावर हजर होऊन रजिस्टर गहाळपकरणी पोलीसात तक्रार दिली. पण त्यानंतर ते पुन्हा रजेवर गेगे. टप्पा अनुदानाच्या अनेक फाईली रखडल्याबाबत वारंवार उपसंचालकांकडून पत्रे येऊनही त्यांनी दुर्लक्ष केले. फडके रजेवर गेल्यामुळे त्यांचा पदभार उपशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांच्याकडे देण्यात आला आहे. अंधारे यांनी आता चांगल्या पद्धतीने काम सुरू केले आहे. त्यामुळे माध्यमिक शिक्षण विभागातील बरीच कामे आता हळूहळू मार्गी लागत आहेत. थोड्याच दिवसात परिस्थितीत आणखी सुधारणा होईल. पण फडके यांनी कामाच्या वेळी रजा काढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या. वारंवार सांगूनही त्यांनी या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव शिक्षण आयुक्तांकडे पाठविण्यात आला आहे अशी माहिती सीईओ आव्हाळे यांनी दिली.
शाळा व आरोग्य केंद्रांच्या इमारत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. यात सोलापूर शहरातील हद्दवाढीतील शाळांचाही समावेश आहे. या शाळांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजनमधून सुमारे दोन कोटीचा निधी आला आहे. शाळांच्या धोकादायक इमारती तात्काळ पाडून त्या ठिकाणी नवीन वर्ग खोल्या बांधण्याचे नियोजन आहे. त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींकडेही लक्ष देण्यात आले आहे. संबंधित विभाग प्रमुखांना याबाबत अहवाल सादर करण्यास सूचना दिल्या असून भविष्यात धोकादायक इमारती राहणार नाहीत, याबाबत दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.