कृषीसोलापूरहवामान

सोलापूरच्या कोठारात यंदा ज्वारी होणार महाग

सोलापूर : ज्वारीचे कोठार म्हणून महाराष्ट्रात ओळख असणाऱ्या सोलापूर जिल्ह्यात यंदा ज्वारीची पेरणी कमी झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे ज्वारीच्या कोठारातच यंदा ज्वारी महाग होणार आहे.

रब्बी पिकाचा जिल्हा म्हणून सोलापूरची ओळख आहे. त्यात रब्बीची सोलापूरची ज्वारी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. रब्बी काळात सोलापूर जिल्ह्यात ज्वारीबरोबरच गहू, हरभरा करडई, जवस, सूर्यफूल आदी पिकांची लागवड होते. उजनीचे सिंचन व सोलापूर जिल्ह्यात साखर कारखानदारी मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर जिल्ह्यातील रब्बीचे क्षेत्र कमी होत गेले आहे. उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर सुरू झाली आहे. अशात कोरोना महामारीनंतर वातावरणातील बदलामुळे सोलापूर जिल्ह्यातील पीक लागवडीचे तंत्रच बदलल्याचे दिसून येत आहे. यंदा खरिपात जून पासूनच पावसाने चांगले हजेरी लावल्यामुळे पेरणी वाढली आहे. डाळीचे भाव वाढल्याने  तूर आणि हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा ओढा दिसून येत आहे. त्यामुळे यावर्षी तुरीचे क्षेत्र वाढल्याचे दिसून आले. अति पावसामुळे गव्हाची पेरणी अजून सुरूच आहे.त्याचबरोबर हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर दिसत आहे. त्यामुळे ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. करमाळा, माढा, मंगळवेढा, मोहोळ, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर तालुक्यात ज्वारीचे क्षेत्र मोठे आहे. पण तुरीचे क्षेत्र वाढल्यामुळे ज्वारीची पेरणी कमी दिसत आहे. दक्षिण सोलापुरात वडकबाळ, वांगी, औराद, कंदलगाव, मंद्रूप, निम्बर्गी, भंडारकवठे या शिवारात तुरीचे पीक जास्त प्रमाणात दिसून आले आहे. त्यामुळे ज्वारीची पेरणी कमी झाली आहे. ज्वारीचे उत्पादन घटणार असल्यामुळे यंदा ज्वारीच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. जानेवारीपासून सोलापूर जिल्ह्यात हुरडा पार्ट्या सुरू होतात. पण ज्वारीचे क्षेत्र घटल्यामुळे हुरडा शोधण्याची वेळ आली आहे. खास ज्वारीसाठी पेरणी केलेले कणसे गतवर्षी शंभर रुपये किलोने विकली जात होती ती यंदा दोनशे रुपये किलोवर गेली आहेत. याशिवाय मागणीप्रमाणे हुरडाच्या कणसाचा पुरवठा दिसून येत नाही. त्यामुळे हुरडा पार्ट्यावर परिणाम दिसून येत आहे. सोलापूर जिल्ह्याचे प्रसिद्ध मालदांडी ज्वारी यंदा कोठारात भाव खाणार अशी चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button