जेऊर झेडपी शाळेचे विद्यार्थी वीरुपाक्ष स्वामी झाले हेडमास्तर
ज्या शाळेत शिकले त्याच शाळेत सेवानिवृत्तीच्यावेळी मिळाला मोठा मान

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या ज्या शाळेत शिक्षण झालं त्याच शाळेत शिक्षक व त्यानंतर मुख्याध्यापक होण्याचा मान वीरुपाक्ष स्वामी यांना मिळाला आहे. अक्कलकोट तालुक्यातील जेऊर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे मुख्याध्यापक म्हणून विरूपाक्ष स्वामी यांनी शनिवारी पदभार घेतल्यानंतर ग्रामस्थांना आनंद झाला व त्यांनी त्यांचा सन्मान केला.
जेऊर जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेचे नवीन हेडमास्तर स्वामी गुरुजींचे स्वागत उपसरपंच काका पाटील यांनी केले. यावेळी पाटील यांनी स्वामी यांचा फेटा बांधून,शाल,श्रीफळ,पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच काशीविश्वेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील आदर्श शिक्षक चानकोटे यांचीही मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल कन्नड व मराठी शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकांत स्वामी यांच्याहस्ते सत्कार कण्यात आला. याप्रसंगी सिद्धाराम कापसे व कन्नड मराठी शाळेची सर्व शिक्षक उपस्थित होते.
वीरुपक्ष स्वामी हे जेऊर जिल्हा परिषद कन्नड शाळेचे विद्यार्थी आहेत. या शाळेतून शिक्षण घेतल्यानंतर 2 जुलै 1990 साली त्यांची पहिल्यांदा शिक्षक म्हणून याच शाळेवर नियुक्ती झाली. त्यानंतर 2005 पर्यंत ते या शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत होते. दरम्यान त्यांनी बीए ही पदवी घेतल्यानंतर पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नतीवर त्यांची बडदाळ शाळेवर नियुक्ती झाली. तिथे दोन वर्षे काम केल्यावर 2007 मध्ये नावदगी शाळेवर बदली झाली. त्यानंतर 2016 मध्ये मंगरूळ शाळेवर बदली झाली. आता निवृत्तीला दोन वर्षे राहिलेले असताना पदोन्नतीवर पुन्हा जेऊर शाळेवर मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल उपसरपंच पाटील यांनी त्यांचा गौरव केला. असा मान मिळायला भाग्यच लागतं, असे ते म्हणाले. सत्काराला उत्तर देताना मुख्याध्यापक स्वामी यांनी ग्रामस्थांनी केलेला हा सत्कार पाहून मी भारावून गेलो आहे. झेडपी प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शाळांमध्ये विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गटशिक्षणाधिकारी परमेश्वर अरबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम तडीस नेणे व माझ्या शाळेचे नाव जिल्ह्यामध्ये होईल, असे काम करण्याचा मानस व्यक्त केला.