सोलापूरजिल्हा परिषद

सोलापूरच्या हद्दवाढ भागातील रात्रीचा पाणीपुरवठा बंद करा: आमदार सुभाष देशमुख

सोलापूर : सोलापूरच्या हद्दवाढ भागात अद्यापही रात्री-अपरात्री पाणीपुरवठा होत आहे. तोही कमी दाबाने होत आहे. याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. रात्री पाणी आल्याने लोकांना त्रास होत आहे. महापालिका अधिकार्‍यांनी अशा भागाची पहाणी करावी आणि पुढील वेळीस या भागात सकाळी पाणीपुरवठा करावा, अशी सूचना आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्त सचिन ओंबासे यांना केली

आ. सुभाष देशमुख यांनी मंगळवारी सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांची भेट घेत शहरातील विविध प्रलंबित नागरी प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, पथदिवे, ड्रेनेज, वाहतूक व्यवस्था तसेच प्रलंबित विकासकामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.या बैठकीत विशेषतः शहरातील पाणीप्रश्न हा बैठकीचा प्रमुख मुद्दा ठरला. प्रभाग क्र. 19 मधील हिमगिरी नगर, कामाक्षी नगर, अंबिका नगर, ईश्वर नगर व उद्धव नगर या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याने टँकर अथवा बोअरवेलच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्याच्या सूचना आमदार देशमुख यांनी दिल्या. प्रभाग क्र. 26 मधील रेणुका नगर, प्रियंका नगर, प्रल्हाद नगर, पंचवटी नगर, सृष्टी नगर, रक्षक पार्क व सुभाष नगर येथे पाइपलाइन असूनही नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा मुद्दाही त्यांनी निदर्शनास आणून दिला.

हँडओव्हर न झालेल्या जुन्या सोसायट्यांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करणे, गॅस व ड्रेनेज पाइपलाइन खोदकामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करणे, मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर स्पीड ब्रेकर बसविणे तसेच झोन कार्यालयांना आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

याशिवाय रेन वॉटर हार्वेस्टिंग’ संदर्भात जनजागृती अभियान राबविणे, मुख्य नगरांकडे जाणार्‍या मार्गांवर दिशादर्शक फलक बसविणे, कल्याणनगर येथील स्टॉर्म वॉटर लाईनचे प्रलंबित काम सुरू करणे, प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करणे तसेच नाला क्र. 13-अ व 14 येथील कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याबाबतही चर्चा झाली. आसरा ब्रिजचे सीमांकन, नाट्यगृह प्रस्ताव, एनटीपीसी निधीअंतर्गत मंजूर कामे तसेच डी-मार्ट ते विजापूर रोड आणि डी-मार्ट ते कुमठे रस्ता परिसरातील प्रलंबित कामांना गती देण्याच्या सूचनाही आमदार देशमुख यांनी यावेळी दिल्या. शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button