सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या दूरदृष्टीमुळे जिल्ह्यातील 406 महिलांचे आयुष्य वाढणार
'निदान प्रोजेक्ट" अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांच्या स्तनाच्या कॅन्सरची तपासणीला वेग

राजकुमार सारोळे
स्पेशल स्टोरी
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या दूरदृष्टीकोनातून ग्रामीण भागातील महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या निदान प्रोजेक्टअंतर्गत स्तनाच्या कॅन्सर तपासणी शिबिरात 406 महिलांना संशयित आजार असून या महिलांची लवकरच मेमोग्राफी करण्यात येणार असून शासनाच्या खर्चातून सर्व उपचार मोफत करण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागात शेतकरी व शेतमजूर कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती व महिलांच्या आजाराविषयी अनास्था असते. दिवसभर सर्वजण काम- काम करीत असतात. त्यामुळे महिला व ज्येष्ठ व्यक्तींच्या आजारांबाबत दुर्लक्ष केले जाते. यातून महिलांना गंभीर आजार बळावू शकतात. ग्रामीण भागात असलेल्या तपासण्या व उपचाराच्या सुविधा तोकड्या असतात. त्यामुळे आजार अंगावर काढण्याचे महिलांमध्ये प्रमाण जास्त असते. त्यामुळेच बऱ्याच महिलांना स्तनाचा कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढले आहे. एकत्र कुटुंब व या आजाराविषयी वाच्यता कशी करायची? अशी एक महिलांमध्ये अडचण असते. त्यामुळे बऱ्याच महिला हा आजार लपवताना दिसतात. तिसऱ्या टप्प्यात निदान झाल्यानंतर खर्च परवडत नाही म्हणून बऱ्याच महिलांना त्रासातून दिवस काढावे लागतात. ग्रामीण भागातील महिलांची ही अडचण व गरज ओळखून जिल्हा परिषद परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतल्यानंतर ‘निदान” प्रोजेक्ट अंतर्गत जिल्हा आरोग्य विभागातर्फे महिलांच्या स्तनाच्या कॅन्सरची तपासणी मोहीम सुरू केली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत ही तपासणी मोहीम वेगात सुरू असून सद्यस्थितीला 406 महिलांना कॅन्सरबाबत संशय आहे. या महिलांची पंढरपूर येथे मेमोग्राफी करण्यात येणार असून यातून निदान झाल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून देण्यात येणाऱ्या दुर्धर आजाराचे 15000 व शासनाचे योजनेतून खर्च करून आजार बरा करण्यासाठी फॉलोअप घेण्यात येत आहे. त्यामुळे सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या दूरदृष्टीमुळे या महिलांचे आयुष्य वाढणर आहे.
‘प्रोजेक्ट निदान” या मोहिमेत जिल्ह्यातील पाच हजार 86 महिलांची फिजिकल स्क्रिनिंग करण्यात आली आहे. यात संशयित वाटलेल्या पाचशे चार महिलांची थर्मल स्क्रीनिंग करण्यात आली. त्यातून आजाराचा संशय असलेल्या 406 ममहिलांची आता मॅमोग्राफी करण्यात येणार आहे मॅमोग्राफी करण्याची सोय पंढरपूर येथे करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली. लवकरच सोलापुरात जिल्हा रुग्णालयात मॅमोग्राफीची सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे महिलांची सोय होणार आहे. या मोहिमेत आढळलेल्या संशयित कॅन्सरग्रस्त महिलांना पुढील मोफत उपचार शासकीय योजनांमार्फत दिले जाणार आहेत.
या महिलांना आर्थिक मदत म्हणून दुर्धर आजार योजनेतून जिल्हा परिषदेच्या सेसमधून 15000 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे, असेही डॉ. नवले यांनी सांगितले.
आषाढी वारीत मोहीम…
निदान प्रोजेक्ट घरोघरी
हीच आमची आषाढी वारी
सांगून गेली आशाताई घरी
करा तपासणी एकदा तरी
करमाळा, माढा, माळशिरस, पंढरपूर तालुक्यातील आरोग्य केंद्रातील आशा वर्कर घरोघरी जाऊन असा संदेश देत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये हा विषय चर्चेचा झाला आहे. येणाऱ्या आषाढी वारीत जिल्हा आरोग्य विभाग ‘निदान प्रोजेक्ट” ही मोहीम वेगाने राबविणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प राज्यस्तरावर लक्ष वेधणार आहे. सध्या प्राथमिक आरोग्य केंद्राकडील आशा वर्कर या मोहिमेत सक्रिय सहभागी होताना दिसत आहेत. घरोघरी जाऊन महिलांना या आजाराचे महत्त्व पटवून तपासणी किती गरजेची आहे, हे सांगितले जात आहे. यासाठी गावातील गल्लीत महिलांच्या बैठका घेतल्या जात आहेत. ज्या महिलांना असा त्रास आहे त्यांच्याशी संवाद साधून त्यांना तपासणीसाठी येण्याबाबत प्रवृत्त केले जात आहे. यात आशा वर्कर, अंगणवाडी सेविका व आरोग्य सेविकांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. गावोगावी सुरू असलेल्या या चळवळीला सीईओ मनीषा आव्हाळे यांनीही प्रोत्साहन दिले आहे. आरोग्य केंद्रांना भेटी देऊन या मोहिमेत काम करणाऱ्या अशा वर्कर व आरोग्य सेविकांना बळ देण्याचे काम सुरू केले आहे. त्यामुळे स्तनाच्या कॅन्सर विषयी आव्हाळे यांनी सुरू केलेली ‘प्रोजेक्ट निदान” मोहीम सध्या चर्चेत आहे. ग्रामीण भागातील आरोग्याच्या प्रश्न लक्षात घेऊन शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यभर ही मोहीम राबविल्यास अनेक महिलांचे आयुष्य वाढणार आहे यात शंका नाही.